गांधीनगर (गुजरात) : गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा आक्रमकपणा दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतो आहे. भाजपविरोधात तर हार्दिकने रणशिंग फुंकले आहे. त्याचवेळी हार्दिकने काँग्रेसशी डील केल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर, हार्दिकने जय शाहवर निशाणा साधला.


हार्दिकने ट्विट करुन म्हटले, "माझ्या बॅगेत काय आहे, हे पाहण्याआधी जय शाहच्या खात्यात पाहणं गरजेचं आहे."

https://twitter.com/HardikPatel_/status/922860731283804160

बॅगेसंदर्भात भाजपने केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे हार्दिकने स्पष्ट केले. "भाजप निराधार आरोप माझ्यावर करत आहे. माझ्या बॅगमध्ये काय होतं, याचं उत्तर मी जनतेला देईन, भाजपला नाही. त्या बॅगमध्ये माझे कपडे आणि काही कागदपत्रं होती.", असे हार्दिकने सांगितले.



बॅगेचं नेमकं काय प्रकरण आहे?

दोन दिवसांपासून एक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे. अहमदाबादमधील ताज उम्मेद हॉटेलमधील हे सीसीटीव्ही फूटेज आहे. हार्दिक पटेल लिफ्टमधून बाहेर पडताना दिसतो. त्याच्या हातात एक बॅग आहे.

भाजपने आरोप केला आहे की, राहुल गांधी आणि हार्दिक पटेलमध्ये डील झाली असून, ही बॅग त्याचा पुरावा आहे.

ताज उम्मेद हॉटेलमध्ये हार्दिक पटेल 22 ऑक्टोबर रोजी रात्री 11.49 वाजता पोहोचला. तेव्हा त्याच्याकडे किंवा सहकाऱ्यांकडे कोणतीही बॅग नव्हती. मात्र हॉटेलमधून निघताना हार्दिकच्या सहकाऱ्यांजवळ बॅग होती, असे वृत्त आहे.

राहुल गांधी याच हॉटेलमध्ये 2 तासांसाठी थांबले होते. मात्र राहुल गांधींशी चर्चा केल्याच्या वृत्ताचं हार्दिकने याआधीच खंडन केले आहे. मात्र एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलचं सीसीटीव्ही फूटेज लीक कसं होतं, असा प्रश्नही हार्दिकने उपस्थित केला आहे.