गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सर्व 182 जागांचे कल हाती आले आहेत. भाजपला बहुमतापेक्षा थोड्या जागा जास्त मिळाल्याचं दिसत आहे. परंतु काँग्रेसनेही भाजपला कडवी झुंज दिली आहे, त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सरस आहे.


मात्र काँग्रेसच्या सध्याच्या कामगिरीचं श्रेय त्या त्रिकुटालाही आहे, ज्याने भाजपला जोरदार टक्कर दिली. या त्रिकुटाने गुजरातमध्ये 22 वर्षांत पहिल्यांदा लढाईची पद्धत बदलली. मागील काही वर्षांत गुजरातमध्ये पहिल्यांदा नव्या पद्धतीची सामाजिक-राजकीय आंदोलनं उभी राहिली. या त्रिकुटात हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोरचा समावेश आहे. पण निवडणूक निकालानंतर आता गुजरातमध्ये या त्रिकुटाच्या भविष्य आणि राजकारणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हार्दिकसाठी प्रतिष्ठा कायम ठेवण्याचं आव्हान?
पाटीदार आंदोलन उभं करणाऱ्या आणि त्याचं नेतृत्त्व करणाऱ्या 24 वर्षीय हार्दिक पटेलची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गुजरातमध्ये केशुभाई यांच्यानंतर हार्दिककडे पाटीदारांचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. हार्दिकने स्वत: निवडणूक लढवली नाही, पण काँग्रेसचं जोरदार समर्थन केलं. काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर गुजरातची लढाई अतिशय रंजक बनली.

भाजप पक्ष पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाला असता तरी, हार्दिकला आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. आरक्षणासाठी 'पाटीदार अनामत आंदोलन समिती'ने उभं केलेलं आंदोलन हे सर्वात मोठं आव्हान आहे.

पाटीदारांसाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता पहिल्यासारखं समर्थन मिळवणं हे हार्दिकसाठी सर्वाधिक कठीण काम ठरु शकतं. पाटीदारांमध्ये आधीच नेतृत्त्वाची वाणवा असल्याचं आंदोलनाच्या सुरुवातीलाच दिसलं. निवडणुकीत हार्दिकने साथीदार नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं होतं. मात्र पाटीदारांच्या नेतृत्त्वाचा पर्याय बनणं हे हार्दिकसाठी सोपं काम नाही.

#2. जिग्नेश मेवाणी आता कुठे जाणार?
गुजरातमधून जगासमोर आलेला आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा चेहरा म्हणजे जिग्नेश मेवाणी. उनामधील दलित मारहाण प्रकरण एक देशव्यापी आंदोलन बनवण्यासाठी 36 वर्षीय जिग्नेशचा मोठा हातभार होता. त्याने 'आझादी कूच'सारखं आंदोलन उभारलं. त्याने मृत जनावरांची विल्हेवाट लावणाऱ्या दलितांना एकजूट करुन उनाच्या घटनेचा निषेध केला.

जिग्नेश काँग्रेसमध्ये सामील झालेला नाही, पण यंदाची विधानसभा निवडणूक बनासकाठा जिल्ह्याच्या बडगाव मतदारसंघातून लढला आणि 18,150 मतांच्या फरकाने जिंकली. दलितांचा नेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. जिग्नेशसारखं राजकारण गुजरातमध्ये पाहायला मिळालं नाही. आता निकालानंतर हे राजकारण कायम ठेवण्याचं आव्हान त्याच्यासमोर आहे.

#3. अल्पेश ठाकोरचं राजकारण प्रभावित होणार?
अल्पेश ठाकोरने गुजरातमध्ये मागासवर्गीयांचं एक मोठं आंदोलन छेडलं. 39 वर्षीय अल्पेशने ओबीसीमध्ये पाटीदारांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध केला आणि ओबीसी एकता मंचाची स्थापना केली. अल्पेश सोबत आल्याने गुजरातमध्ये भाजप सरकारविरोधात ओबीसी-दलित राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी अल्पेश काँग्रेसमध्ये सामील झाला. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर राधनपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकली. मात्र अल्पेश पाटीदार आंदोलनाचा विरोध करत आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून त्याचं राजकारण प्रभावित होऊ शकतं.

#तिघांसाठी सुरक्षित पर्याय कोणता?

विधानसभा निवडणुकीचा काळ तिघांसाठी महत्त्वाचा आहे. काँग्रेससोबत राहण तिघांसाठी फायदेशीर आहे. पण यात काही अडचणी आहेत, ज्याचे दुष्परिणामही आहेत. राज्यात तिघेही भाजपचे विरोधक आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेससारख्या पर्यायासोबत राहणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. भाजपविरोधात दोन मोठे आणि तरुण चेहरे विधानसभेत दाखल होतील आणि हार्दिक पटेलच्या रुपात एक मोठा चेहरा विधानसभेच्या बाहेर असेल.

मात्र या तिघांमधील वैचारिक-राजकीय वाद मोठा अडथळा ठरु शकतो. अल्पेश ओबीसी राजकारणाचा चेहरा आहे. ओसीबी कोट्यात पाटीदारांच्या वाट्याचा तो सातत्याने विरोध करत आहे आणि सध्या तो काँग्रेसमध्ये आहे. हार्दिकही  काँग्रेससोबत आहे, पण त्याच्या आंदोलनात काँग्रेस कशी साथ देणार? पाटीदार आंदोलनाबाबत अल्पेशची काय भूमिका असेल आणि जिग्नेश गुजरातमध्ये दलितांसाठी कशाप्रकारे उपयुक्त सिद्ध होईल? हे पाहणं उत्सुकतेचं असेल. निकालानंतर त्यांना आपापल्या समाजातूनच अनेक प्रकारच्या दबावांचा सामना करावा लागेल हे, मात्र निश्चित.