गांधीनगर: भाजपने पुन्हा एकदा गुजरातमध्ये कमळ फुलवलं आहे. मात्र पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना दीडशेचा आकडा गाठता आलेला नाही.

दुपारपर्यंत भाजपने 182 पैकी शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतली.

गुजरात निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं असताना, गुजरातचं लक्ष मात्र मणिनगरकडे लागलं होतं.

मणिनगर हा तोच मतदारसंघ आहे, ज्यामध्ये पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी विधानसभेची निवडणूक लढवत होते.

या मतदारसंघात पुन्हा एकदा मतदारांनी भाजपलाच पसंती दिली आहे. मणिनगरमधून भाजपचे उमेदवार सुरेशभाई धनजीभाई पटेल हे तब्बल 75199 मतांनी विजयी झाले आहेत.

सुरेशभाई पटेल यांनी काँग्रेसची युवा नेता श्वेता ब्रह्मभट्ट यांचा पराभव केला.

सुरेशभाई पटेल यांना 1 लाख 16 हजारांहून अधिक मतं मिळाली, तर श्वेताबेन यांना 40914 मतं मिळाली.

श्वेता ब्रह्मभट्ट यांचं धाडस

मणिनगर हा भाजपचा गड मानला जातो. या मतदारसंघात 2002,2007 आणि 2012 मध्ये नरेंद्र मोदी यांनी विजय मिळवला होता. तर 1990 ते 1998 पर्यंत भाजप नेते कमलेश पटेल यांनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं होतं.

मात्र तरीही याच मतदारसंघात भाजपच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस श्वेता ब्रह्मभट्ट यांनी दाखवलं होतं.

2012 मध्ये नरेंद्र मोदी यांनी याच मतदारसंघात, आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची पत्नी आणि काँग्रेस उमेदवार श्वेता भट्ट यांचा 86 हजार मतांनी पराभव केला होता.

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुरेश पटेल विजयी झाले होते.

कोण आहे श्वेता ब्रह्मभट्ट?

34 वर्षीय श्वेता ब्रह्मभट्ट उच्चशिक्षित आहे. श्वेता यांनी मॅनेजमेंट क्षेत्रातील मानाच्या IIM बंगळुरुतून शिक्षण घेतलं आहे.

आयआयएममध्ये त्यांनी ‘भारत- महिलांचं नेतृत्व’ हा कोर्स केला आहे.

श्वेता यांनी 2005 मध्ये लंडनमधील वेस्टमिंस्टर युनिव्हर्सिटीतून ‘इंटरनॅशनल फायनान्स’चा अभ्यास केला आहे.

भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केलं आहे.

श्वेता यांचे वडिल नरेंद्र ब्रह्मभट्ट हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र यंदा त्यांच्याऐवजी श्वेता यांना तिकीट देण्यात आलं.

सिस्टिम बदलण्यासाठी सिस्टिमचा भाग बनणं आवश्यक असतं, त्याच उद्देशाने त्यांनी निवडणूक लढवली.