Gujarat Assembly Election 2022 : गुजरात ( Gujrat ) विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, गुजरातची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तर यंदा गुजरात निवडणुकीत आम आदमी पार्टी पक्षानं एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत दिसणार आहे. 


यापूर्वी 2017 रोजी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत 99 जागांवर विजय मिळवत भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता. यंदा भाजप, काँग्रेस यांच्यासोबतच आम आदमी पार्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे यंदा केवळ भाजप आणि काँग्रेस अशी दुहेरी नाहीतर भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिहेरी लढत दिसणार आहे.  


2017 च्या निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर, गुजरातमधील 182 पैकी 115 जागांवर आणि हिमाचल प्रदेशातील 68 पैकी 12 जागांवर EVM मशीनवर NOTA (वरीलपैकी एकही नाही) चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर होता. यावेळच्या निवडणुकीत दोन्ही राज्यांमध्ये प्रवेश करण्याच्या आम आदमी पक्षाच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा कल महत्त्वाचा मानला जातो. अशातच गुजरातमधील जनता आम आदमी पार्टीकला नवा पर्याय म्हणून कितपत पसंती देणार? हे पाहणं महत्त्वाच ठरत आहे. 


गेल्या विधानसभा निवडणुकीत 3 कोटी मतदारांमध्ये जवळपास 5.51 म्हणजेच, 1.84 टक्के मतदारांनी नोटाला मतं दिली होती. हिमाचलमध्ये 37.84 लाख मतदारांपैकी 34,232 म्हणजेच, 0.90 टक्के मतदारांनी नोटाला मत दिलं होतं. 


गुजरातमध्ये, NOTA ची एकूण मतं भाजप (49.05%) आणि काँग्रेस (41.44%) नंतर तिसऱ्या क्रमांकाची (1.84%) होती. त्या वर्षीच्या हिमाचल निवडणुकीत NOTA चे मताधिक्य भाजप (48.79%), काँग्रेस (41.68%) आणि CPI(M) (1.47%) नंतर चौथ्या क्रमांकावर (0.90%) होते.


गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक, 1 आणि 5 डिसेंबरला मतदान


केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी दिवशी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 89 आणि दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर निवडणूक होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असल्याने या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. 4.9 कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत. गुजरात विधानसभेत 182 जागा आहेत.