Gujarat Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी दिवशी मतदान होणार आहे. मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. 4.9 कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत. गुजरात विधानसभेत 182 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 89 आणि दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर निवडणूक होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असल्याने या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर केली आहे. 50 टक्के मतदान केंद्राचे थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. 51,782 मतदान केंद्र असून प्रत्येक बूथमध्ये सरासरी 948 मतदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 3.24 लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये लढत
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे आव्हान आहे. 2017 मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसने जोरदार टक्कर दिली होती. भाजपचे संख्याबळ 100 खाली आले होते. तर, काँग्रेसने 80 जागांवर मुसंडी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेले हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा कमळ हाती घेतला. तर, काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर, दुसऱ्या बाजूला गुजरातच्या शहरी भागात आम आदमी पक्षाची ताकद वाढली असल्याचे नगरपालिका, महापालिका निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.
असा असणार निवडणुकीचा कार्यक्रम
>> नोटिफिकेशन:
पहिल्या टप्प्यासाठी - 5 नोव्हेंबर 2022
दुसऱ्या टप्प्यासाठी- 10 नोव्हेंबर 2022
>> अर्ज दाखल करण्याची तारीख:
पहिल्या टप्प्यासाठी - 5 नोव्हेंबर 2022
दुसऱ्या टप्प्यासाठी- 10 नोव्हेंबर 2022
>> अर्ज छाननीची तारीख:
पहिल्या टप्प्यासाठी - 15 नोव्हेंबर 2022
दुसऱ्या टप्प्यासाठी- 18 नोव्हेंबर 2022
>> अर्ज माघारीची शेवटची तारीख
पहिल्या टप्प्यासाठी - 17 नोव्हेंबर 2022
दुसऱ्या टप्प्यासाठी- 21 नोव्हेंबर 2022
गुजरात निवडणुकीची वैशिष्ट्ये:
> कोरोनाबाधितांसाठी घरातून मतदान करण्याची व्यवस्था
> गिर जंगलात फक्त एका मतदारासाठी मतदान केंद्र असणार
> 9.87 मतदार 80 वर्षावरील मतदार
> 4.6 लाख युवा मतदार
> दिव्यांगांसाठी 182 विशेष मतदान केंद्र असणार
> गुजरातमध्ये 4 लाख 4 हजार दिव्यांग मतदार
> 142 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले