Gujarat Assembly Election 2022  : आज गुजरातच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला दाखल झाली आहे. महाराष्ट्र भाजपमधील अनेक नेतेमंडळी गेल्या काही महिन्यांपासून गुजरातचे दौरे करत होते. त्यात आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसह आमदार आणि अन्य पदाधिकारी अशी महाराष्ट्र भाजप  टीम गुजरातच्या मैदानात पोहोचली आहे.



12 आमदार आणि अन्य पदाधिकारी असे एकूण 50 जण गुजरातमध्ये दाखल -


मुंबईतील भाजपचे आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात एकूण बारा आमदार आणि अन्य पदाधिकारी अशा 50 जणांची एक टीम तयार करण्यात आली आहे. गुजरातमधील सहा जिल्ह्यांच्या 33 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.


कुठल्या भागातली जबाबदारी महाराष्ट्रातील नेत्यांवर दिली ?
दक्षिण गुजरातमधील डांग, वलसाड, नवसारी, सुरत, तापी आणि भरुच या सहा जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. हे सगळे जण काही दिवसांपासून गुजरातचे दौरे करत आहेत. त्यात महाराष्ट्र भाजपचीही सर्व टीम गुजरातमध्ये दाखल झाली आहे. तर काही नेते महाराष्ट्रातून ये जा करून आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत हे सगळे गुजरातमध्येच मुक्कामी असतील.


गुजराती समजाशी असलेला कनेक्ट लक्षात घेता हा निर्णय
मुंबईत गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. येथील गुजराती समाजाच्या नेत्यांशी गुजरातमध्ये असलेला कनेक्ट लक्षात घेऊन त्यांना या मोहिमेवर धाडण्यात आले आहे. या शिवाय गुजरातला लागून असलेल्या जळगाव, नाशिक जिल्ह्यांतील आमदारांवरही जबाबदारी टाकण्यात आली आहे.


कोणते नेते गुजरात दौऱ्यावर आहेत ?
मुंबईतील पक्षाचे आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात एकूण 12 आमदार आणि अन्य पदाधिकारी अशा 50 जणांची टीम आहे. यात  मनीषा चौधरी, संजय सावकारे, संजय केळकर, पराग अळवणी,  सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, निरंजन डावखरे, सुरेश भोळे, राहुल ढिकले, राजेश पाडवी, उमा खापरे या आमदारांच्या खांद्यावरही जबाबदारी दिली गेली आहे.


महाराष्ट्रातून भाजपचे गेलेले नेते गुजरातमध्ये काय करतात ?
 महाराष्ट्रातून गेलेले नेते त्यांना वाटून दिलेल्या मतदारसंघांमध्ये लोकांचा फीडबॅक घेतात. सरकारी योजनांचा लाभ कोणाला आणि का मिळाला नाही? याची माहिती घेऊन वंचित असलेल्यांना लाभ देण्यासाठी समन्वय साधतात. भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख यांच्या बैठका, गाव, शहरांतील प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी घेतात. धार्मिक, सामाजिक समीकरणांची माहिती घेतात. यानंतर ही सर्व माहिती आमदार योगेश सागर आणि सुनील कर्जतकर यांना सगळे रिर्पोटिंग करतात. तसेच गुजरातच्या प्रत्येक भागात सर्व लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हे महाराष्ट्रातील हे नेते दिलेल्या विभागानुसार पाहतात.