Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा (Air India Plane Crash In Ahmedabad) ब्लॅक बॉक्स (Black Box) सापडला आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय. तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अहमदाबादमधील घटनास्थळाला भेट देणार आहेत. अमित शाहांनी काल घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच जखमींची रूग्णालयात जाऊन विचारपूसही केली.
ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार-
अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स सापडला आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स सापडला आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून अपघाताआधीची महत्त्वपूर्ण माहिती समजणार आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून अपघाताआधी माहिती समजणार आहे. दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं.
पंतप्रधान मोदींनी केली अपघातस्थळाची पाहणी-
सदर विमान अपघातानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावर 20 मिनिटं नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. अपघाताची कारणं, झालेलं नुकसान याची माहिती नरेंद्र मोदींनी घेतली. तसेच पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्याचं पाहायला मिळाले. विमान अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदी रुग्णालयात देखील गेले. यावेळी अपघातातील जखमींची नरेंद्र मोदींनी विचारपूस केली. रूग्णालयात नरेंद्र मोदी जवळपास 10 मिनिटे उपस्थित होते.
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू-
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समुहाने जाहीर केलं आहे. टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दुर्घटनेची चार संभाव्य कारणं?
1) विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा...
2) लँडिंग गियर टाकता आला नसावा, लँडिंग गियर वेग कमी करतो...
3) पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी...
4) टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत...
अमित शाह काय म्हणाले?
सदर अपघातानंतर संपूर्ण देश स्तब्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. अपघातानंतर 10 मिनिटात भारत सरकारला माहिती मिळाली. तातडीनं मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, नागरी उड्डयण मंंत्री, नागरी उड्डयण विभाग सर्वांसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन लगेच आला होता, असं अमित शाह यांनी सांगितलं. भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य करत आहेत. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परिक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृत पणे जाहीर करेल, अशी माहिती देखील अमित शाह यांनी दिली.
अहमदाबाद विमान अपघाताच्या काही सेकंदाचा पूर्वीचा CCTV, VIDEO:
संबंधित बातमी:
Gujarat Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना, 5 मुद्द्यात समजून घ्या नेमकं काय घडलं?
