बंगळुरु: पर्यावरवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात पहिली अटक झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुमधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे. दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' मोहिमेची संस्थापक सदस्य आहे.
ग्रेटा थनबर्गने शेअर केलेल्या टूलकिटच्या माध्यमातून देशातील वातावरण बिघडवण्याचा कट रचला जातोय, भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे असा आरोप करत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कलम 124 ए (राजद्रोह), 153 ए, 153 आणि 120 बी अंतर्गत फिर्याद दाखल केली. या गुन्ह्यामध्ये ग्रेटाचे नाव लिहिलेले नाही, पण तिच्या ट्विट आणि टूलकिटवर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करत सुरु असल्याचं दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने स्पष्ट केलं आहे.
पॉप गायिका रिहानानंतर, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिच्यासह अनेक जागतिक ख्यातनाम व्यक्तींनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. यावर भारत सरकारच्या वतीनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली गेली होती.
ग्रेटा थनबर्गने अपलोड केलेल्या टूलकिटबाबत दिल्लीत गुन्हा दाखल
ग्रेटाने शेतकरी आंदोलन समर्थनार्थ ट्विटरवर लिहिले की, "आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत." त्याचसोबत तिने एक टूलकिट शेअर केलं. यावरुन वाद झाल्यानंतर ग्रेटाने हे टूलकिट आपल्या ट्विटर अकाउंटवरुन डिलीट केलं होतं.
दिल्ली पोलिसांनी दिशा रवीची चौकशी केल्यानंतर तिने या टूलकिटमध्ये काही बदल केलं असल्याचं कबुल केल्याची माहिती समोर आली आहे. आपण या टूलकिटमध्ये काही गोष्टींमध्ये एडिट केलं आणि काही गोष्टी अॅड केल्या आणि नंतर ते टूलकिट फॉरवर्ड केलं असं दिशा रवीने दिल्ली पोलिसांना सांगितल्याचं समजतंय.
प्राथमिक तपासातून हे स्पष्ट होतंय की संबंधित टूलकिट हे खलिस्तानी समर्थकांनी तयार केलं आहे. त्याचा उद्देश हा शेतकरी आंदोलनाच्या आड देशात सामाजिक तणाव वाढवण्याचा असल्याचं दिल्ली पोलिसांनी या आधीच स्पष्ट केलं आहे.