नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या संक्रमणात सातत्याने घसरण पहायला मिळतेय. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे केवळ 12,143 नवे रुग्ण सापडले असून 103 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 80,80,844 इतक्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. काल एकाच दिवसात 4.62 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


गेल्या महिन्याच्या 16 तारखेला भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. याला आता जवळपास महिना पूर्ण होत असून देशात 8,080,844 इतक्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी एक कोटी 73 लाख लोकांनी आपले नाव नोंदवले आहे अशी आकडेवारी सरकारच्या को-विन या अॅपमध्ये नोंद आहे.


देशात सुरु असलेल्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी भारतीयांचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलंय. त्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावर नियोजन सुरु आहे. महत्वाचं म्हणजे या 25 कोटी लोकांना कोरोनाचा डबल डोस देण्याचं नियोजन केंद्र सरकार करत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे.


Lockdown | कोरोना रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो : छगन भुजबळ


येत्या जुलै महिन्यापर्यंत भारतातील जवळपास 20 ते 25 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 40 ते 50 कोटी डोस उपलब्ध करणे आणि त्याचा वापर करणे यासाठीचे नियोजन सुरु आहे. तसेच त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, प्रशिक्षण या क्षमतामध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं होतं.


कोरोना वल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात जगभरात 3.59 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर नऊ हजारांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जगात आठ कोटी 12 लाख 18 हजार लोकांना कोरोना झाला आहे. यात सर्वाधिक म्हणजे अमेरिकेत 78 हजार तर ब्राझिलमध्ये 44 हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तुलनेने भारतात परिस्थिती नियंत्रणात येत आहे.


Covid-19 Sero Survey: देशातल्या 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला, राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल