Rahul Gandhi On Sonia Gandhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा सुत्रे हाती घेतली आहेत. काल (26 ऑक्टोबर) सोनिया गांधींसह (sonia gandhi) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत खर्गेंनी पदभार स्वीकारला. तब्बल 23 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणाऱ्या सोनिया गांधी आता अध्यक्ष पदातून मुक्त झाल्या आहेत. त्यानंतर बुधुवारी झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधीं, प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या कार्यकाळाची आठवण करुन दिली. तसेच त्यांच्या काळातील अनुभवही सांगितले. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपली आज्जी इंदिरा गांधी यांच्या आठवणीचा दाखला देत आई सोनिया गांधी यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट केली आहे.
तुझा मुलगा असल्याचा अभिमान
राहुल गांधी यांनी आपल्या आई सोनिया गांधी यांच्या संदर्भानं एक भावनिक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी आपले वडील दिवंगत राजीव गांधी यांचा सोनिया गांधी यांच्याबरोबर असलेला फोटो देखील शेअर केला आहे. 'आई, आज्जीने मला एकदा सांगितले होते की, मला तुझ्यासारखी मुलगी कधीच मिळणार नाही, तू सर्वात चांगली मुलगी आहेस. आज्जीनं सांगितलेलं अगदी बरोबर होते असे ट्वीटमध्ये राहुल गांधींनी म्हटलं आहे. तसेच मला तुझा मुलगा असल्याचा अभिमान असल्याचे देखील राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तू हे सगळं प्रेमासाठी केलंस
सोनिया गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदावरुन मुक्त केल्यानंतर त्यांची मुलगी प्रियांका गांधी यांनीही इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. ...जग काहीही म्हणो किंवा विचार करो, मला माहित आहे, तू हे सर्व प्रेमासाठी केलं आहेस. प्रियंका गांधी यांनी देखील सोनिया गांधींचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सोनिया गांधी यांच्या हातात दिवंगत राजीव गांधी यांचा एक फोटो आहे. हा फोटो त्यांनी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेट दिला आहे.
मिळालेलं प्रेम आणि आदर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेन
काँग्रेस नेतृत्वाची मोठी जबाबदारी आहे. मला आत्तापर्यंत मिळालेलं प्रेम आणि आदर मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेन आणि स्वीकारेन असे सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी होती असेही त्या म्हणाल्या. आज या जबाबदारीतून मी मुक्त होत आहे, असे त्या म्हणाल्या.
सोनिया गांधी सर्वाधिक काळ अध्यक्षपदावर
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबरला मतदान झाले होते. तर 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव केला. त्यामुळं 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला. सोनिया गांधी या पक्षाच्या सर्वात जास्त काळ अध्यक्षा राहिल्या आहेत. त्यांनी 1998 ते 2017 पर्यंत काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यानंतर 2019-22 पर्यंत देखील त्याच अंतरिम प्रमुख होत्या.
महत्त्वाच्या बातम्या: