नवी दिल्ली : देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सरकारने सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकला सहा कोटींहून अधिक लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची एकूण किंमत जवळपास 1300 कोटी रुपये इतकी आहे.
भारत बायोटेक कंपनीला सरकारच्या वतीनं 55 लाख लसींच्या डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. ज्याची किंमत जवळपास 162 कोटी रुपये आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशिल्ड' लसीचे 1.1 कोटी डोस खरेदी करण्यासाठी सोमवारी ऑर्डर देण्यात आली. जीएसटीसहीत एका लसीच्या डोसची किंमत साधारणपणे 210 रुपये असणार आहे. एप्रिलपर्यंत 4.5 कोटी डोस खरेदी करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष आहे. 1.1 कोटी लसींच्या डोसची किंमत जवळपास 231 कोटी रुपये आहे. तर उरलेल्या 4.5 कोटी लसींच्या डोसची किंमत मिळून सध्याच्या किमतीनुसार एकूण खर्च 1176 कोटी रुपये इतका असणार आहे. दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक गुजरातसाठी रवाना झाले आहेत. तसेच आज 13 वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना लसींचे डोस पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. त्याआधी पोलिसांकडून लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पुजाही करण्यात आली. ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे. आज अशाप्रकारची आणखी तीन वाहनं लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे.
गुजरातमध्ये पोहोचणार लस
कोविड-19 च्या लसीची पहिली बॅच आज गुजरातमध्ये पोहोचणार आहे. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लसींची पहिली बॅच उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांना सांगितलं की, लसीकरणाशी संबंधित सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. गुजरातमध्ये कोविड-19 लसीकरण अभियान 25,000 सेंटर्सवर सुरु होणार आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी 16 जानेवारी रोजी गुजरातच्या 287 सेंटर्सवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील. यादरम्यान अहमदाबाद आणि राजकोटमधील दोन ठिकाणांवरील डॉक्टर्स आणि लस टोचून घेणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधतील.
केंद्र सरकार उचलणार खर्च
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घोषणा केली आहे की, कोरोना लसीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. त्याचसोबत त्यांनी स्पष्ट केलं की, या टप्प्यात लोकप्रतिनिधींचा समावेश होणार नाही.
16 जानेवारी, 2021 पासून देशव्यापी लसीकरण अभियानाला सुरुवात होणार आहे. लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. ते म्हणाले की, कोविड-19 च्या लसीकरणारा गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून जवळपास 50 देशांमध्ये सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केवळ अडीच कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. तर भारताचं लक्ष्य पुढील काही महिन्यांत 30 कोटी लोकांना लस देण्याचं आहे.