नवी दिल्ली : ताटात घेतलेलं अन्न वाया घालवू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मधून देशवासियांना दिल्यानंतर सरकारनेही त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. हॉटेलमध्ये ऑर्डर करताना ग्राहकांना एका प्लेटमध्ये किती प्रमाणात अन्न मिळणार, हे स्पष्ट करावं लागणार आहे.

केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना यासंबंधी पावलं उचलण्यास सांगितलं आहे. तुम्ही स्वतःच याबाबत गांभीर्याने पावलं उचलणार, की आम्ही त्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, अशी विचारणा पासवान यांनी केली आहे.

फुल प्लेट भाजीची सक्ती नाही, अर्ध्या किंवा पाव प्लेटचा पर्याय


देशभरात मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आठवड्यांपूर्वी 'मन की बात' या कार्यक्रमातून चिंता व्यक्त केली होती. ताटात आवश्यक तितकंच अन्न घ्या, आणि घेतलेलं अन्न वाया घालवू नका, असं मोदींनी सुचवलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच पासवान यांनी याच प्रकारचं मत व्यक्त केलं आहे.

'माझ्या वैयक्तिक अनुभवांतून ही कल्पना आली आहे. जेव्हा आपण बाहेर खायला जातो, तेव्हा अन्नाची प्रचंड नासाडी होताना पाहतो. दुसरीकडे देशात असेही काही नागरिक आहेत, ज्यांना खायला अन्न मिळत नाही.' असं पासवान यांनी सांगितलं.

हॉटेल किंवा रेस्टॉरंट्सनी किती अन्न सर्व्ह करावं, याबाबत सरकार कोणतीही नियमावली करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र तुम्ही एका प्लेटमध्ये किती चपात्या, किंवा इडल्या किंवा चिकनचे पीसेस देणार, याचा उल्लेख करा, इतकी अपेक्षा हॉटेल्सकडून असल्याचं पासवान म्हणाले.