लखनौ : मागील तीन दशकांपासून भाजपच्या खात्यात असलेल्या गोरखपूरच्या जागेवर यंदा समाजवादी पक्षाने आपला झेंडा फडकवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत सपाचे उमेदवार प्रवीण निषाद यांनी भाजपचे उमेदवार उपेंद्र दत्त शुक्ला यांना 21,881 मतांनी पराभूत केलं.

प्रवीण निषाद यांना 4,56,513 मतं मिळाली, तर भाजप उमेदवाराला 4,34,632 मतंच मिळवता आली. विशेष बाब म्हणजे ज्या केंद्रावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मत दिलं, तिथे एकूण 1775 लोकांनी मतदान केलं. त्यापैकी भाजपला केवळ 43 मतंच मिळली.

पोटनिवडणुकीत सपाला बसपासह अनेक पक्षांसोबतच्या युतीचा फायदा मिळाला. मुस्लिम, यादव, दलित आणि निषादांची मतं पक्षाला मिळाली. तर काँग्रेस अजूनही राज्यात आपल्या मतांसाठी संघर्ष करताना दिसली. त्यामुळेच काँग्रेस उमेदवार डॉ. सुरहीता करीम यांना केवळ 18,844 मतंच मिळवता आली आणि त्याचं डिपॉझिट जप्त झालं.

शहरी मतदार हे भाजप समर्थक असल्याचं समजलं जातं. पण या पोटनिवडणुकीत शहरांमधील मतदानाची टक्केवारी कमी होती. भाजप नेते केवळ कार्यलयांमध्ये बसून निवडणुकीचे अंदाज बांधत राहिले आणि मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यास अपयशी ठरले. याचा परिणाम भाजपला निवडणुकीच्या निकालात भोगावा लागला.

याशिवाय भाजपने फक्त योगी मॅजिकवर विश्वास ठेवला, ज्यामुळे तळागाळापर्यंत सरकारची कामं पोहोचवण्यात आणि समजवण्यात कार्यकर्ते अपयशी ठरले. या निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी 16 कार्यकर्ता मेळावे आणि सभा घेतल्या. पण कार्यकर्त्यांमधील उत्साहाच्या अभावामुळे भाजपचा इथे पराभव झाला.

संबंधित बातम्या

‘अतिआत्मविश्वास नडला’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर योगींची प्रतिक्रिया