नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांचा पराभव करण्यात इगो आडवा येऊ नये, यासाठी नेतृत्वाचा मुद्दा गौण धरण्यावर विरोधकांमध्ये एकमत झालं आहे. तसेच, निवडणुकीनंतर नेतृत्वाचा निर्णय योगदानाच्या निकषावर घेता येईल असंही ठरलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी यासंदर्भात माहिती दिली.


काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी ही माहिती दिली.

खासदार माजिद मेमन नेमके काय म्हणाले?

“विरोधकांच्या एकीमध्ये सर्वात कळीचा मुद्दा नेतृत्त्वाचा असतो. यावेळी मात्र असं ठरलंय की, नेतृत्वाचा विषय आधी आणायचा नाही. आधी सगळ्यांनी एकत्र यायचं, भाजपला हरवणं हा मुख्य अजेंडा आहे.”, अशी माहिती खासदार माजिद मेमन यांनी दिली.

तसेच, कुणाचं किती योगदान यांवर निकालानंतर नेतृत्वाची चर्चा होईल, असेही बैठकीत ठरल्याचे खासदार माजिद मेमन यांनी सांगितले.

सोनिया गांधी यांची डिनर डिप्लोमसी

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेत, 13 मार्च रोजी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

या डिनरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राजदचे तेजप्रताप यादव, बसपा नेते सतीश चंद्र, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, तारीक अन्वर, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंह, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, शरद यादव, आययूएमएलचे पी. के. कुन्हालीकुट्टी, एआययूडीएफचे बद्रुद्दीन अजमल, केरळ काँग्रेसचे जोस के. मणी, जनता दल सेक्युलरचे डी. कुपेंद्र रेड्डी आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांची उपस्थिती होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला हे नेतेही डिनरला हजर होते.

दरम्यान, कालच अखिलेश आणि मायावतींच्या युतीने योगींना गोरखपूर आणि फुलपूरमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्याची पुनरावृत्ती देशभर करण्यासाठी महाआघाडीचा प्रयत्न सुरु झाला आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवारांच्या घरी जाऊन राहुल गांधींची खलबतं!

मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी

पोटनिवडणुकीचा निकाल 2019 पूर्वी भाजपसाठी धोक्याची घंटा!

यूपीत योगींचा गड हादरण्यामागचं नेमकं कारण काय?