Google Doodle : आपल्या अनोख्या शैलीमध्ये वेगवेगळ्या शुभेच्छा देण्यामध्ये गुगल डुडल प्रसिद्ध आहे. आजही जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून अशाच आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. या संबंधी एक अॅनिमेटेड व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
गुगलन डुडलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये महिलांच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या नोबेल पुरस्कार प्राप्त महिला ते क्रिडा,मनोरंजन विज्ञान या क्षेत्रातील महिलांच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये महिलांच्या मतदानाच्या अधिकाराची विशेष नोंद करण्यात आली आहे. एकमेकांचा हात हातात घेतलेल्या महिलांचे हात आणि विविध क्षेत्रातील महिलांच्या केवळ हात या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत असून हा व्हिडीओ अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
International Women's Day जागतिक महिला दिन हा 1900 च्या काळापासून प्रकाशझोतात आला. ज्यावेळी महिलांच्या सामाजिक अस्तित्त्वाबाबत बदलांचे वारे वाहू लागले होते. 1908 मध्ये 15000 महिलांनी कामाचे कमी तास, चांगलं वेतन आणि मतदानाच्या हक्कांसाठी न्यू यॉर्क शहराच्या दिशेनं कूच केली होती. ही पहिली महिला चळवळ ठरली. काही महिन्यांच्या आंदोलनानंतर पहिला राष्ट्रीय महिला दिवस युनायटेड स्टेट्स येथे 28 फेब्रुवारी या दिवशी पाळला गेला.
सुरुवातील 19 मार्चला ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी या देशांत महिला दिन हा 19 मार्चला साजरा करण्यात आला. त्यानंतर रशियामध्ये 1913-14 च्या दरम्यान तो 23 फेब्रुवारी या दिवशी साजरा करायला सुरुवात झाली. नंतर या तारखेमध्ये बदल होऊन 8 मार्चला महिला दिवस साजरा करायला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा पहिल्यांदा 1975 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं साजरा करण्यात आला.