Google Case Hearing in Supreme Court: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या गूगल (Google) अँड्रॉईड प्रकरणी (Google Case Hearing) आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. काल (बुधवारी) याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. त्यावेळी गुगलनं अनेक बाजारपेठांमध्ये आपल्या वर्चस्वाचा कथित गैरवापर केल्याचा मुद्दा 'राष्ट्रीय महत्त्वाचा' (National Importance) असल्याचं सुनावणी दरम्यान, भारतीय स्पर्धा आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. तसेच, या प्रकरणाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचंही स्पर्धा आयोगानं म्हटलं. त्यामुळे आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


गूगल अँड्रॉईड प्रकरणी (Google 1337 Crore Rupees Fine Case) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. दरम्यान, भारतीय स्पर्धा आयोगानं (Competition Commission of India) सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, अँड्रॉईड प्रकरणात टेक्नोलॉजी कंपनी गुगलनं अनेक बाजारपेठांमध्ये आपल्या वर्चस्वाचा कथित गैरवापर केल्याचा मुद्दा 'राष्ट्रीय महत्त्वाचा' आहे. आता हा मुद्दा आता भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. या प्रकरणी भारत काय तोडगा काढतोय, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. 


सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एन.के. वेंकटरामन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करावी आणि Google ला राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणा (National Company Law Appellate Tribunal) अंतर्गत 'टू इनिंग' देऊ नये.


सरकार दोन टप्प्यांत देण्याच्या बाजूने नाही


यापूर्वी, खंडपीठाने सुरुवातीला सांगितलं होतं की, ते हे प्रकरण अपीलीय न्यायाधिकरणाकडे पाठवण्याचा विचार करत आहे. या सुनावणी वेळी गुगलच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांच्या सूचनेशी सहमत असल्याचंही सांगितलं. न्यायालयाने हे प्रकरण ऐकून निकाली काढावं, अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे. यावर खंडपीठाने म्हटलं होतं की, कोणासाठीही दोन संधी असू शकत नाहीत, यावर आम्ही ठाम आहोत. दरम्यान, आज पुन्हा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.   


प्रकरण नेमकं काय? 


अँड्रॉईड ही एक लोकप्रिय 'ओपन सोर्स' मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे जी स्मार्टफोन आणि टॅब्लेट निर्मात्यांद्वारे वापरली जाते. तसेच, ही प्रणाली 'ओपन सोर्स' असल्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारचं उपकरण तयार करण्यासाठी त्याचा वापर करु शकतो.


गुगलच्या याचिकेवर सुनावणी


गुगल या अमेरिकन कंपनीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याचिकेत अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देण्यात आलं आहे. या आदेशात, बाजारातील वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल स्पर्धा आयोगाने ठोठावलेल्या 1337 कोटी रुपयांच्या दंडावर कोणतीही अंतरिम सवलत नाकारण्यात आली आहे. याचसंदर्भात गुगलने याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.