नवी दिल्ली : कोरोना व्हायरस Coronavirus च्या पार्श्वभूमीवर अनेकांनीच प्रवासापासून दूर राहणं पसंत केलं. विषाणूच्या संसर्गाच्या भीतीनं प्रवास न केलेलाच बरा, अशीच ठाम भूमिका काहींनी घेतली. यातच विमान प्रवासाबाबत सांगावं तर, याचे दरही प्रवाशांच्या खिशाला चाप लावणारे. त्यामुळं विमान प्रवास क्वचितच करणाऱ्यांची संख्याही तुलनेनं जास्त. पण, याच साऱ्या वातावरणात विमान प्रवास अधिक सोपा आणि स्वस्त करत एअर इंडिया या कंपनीकडून प्रवाशांना खास सवलत देण्यात येत आहे.


ठराविक वर्गातील प्रवाशांसाठी एअर इंडियाकडून ही सवलत पुरवण्यात येत आहे. ज्यामध्ये प्रवास भाडं हे अर्ध्यावर आणण्याचा निर्णय Air India कडून घेण्यात आला आहे. ६० वर्षांहून जास्त वय असणाऱ्या प्रवाशांसाठी सदर विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीनं तिकीट दरांवर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.


एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांना आता एअर इंडिया अर्ध्या दरात तिकीट उपलब्ध करुन देणार आहे. संकेतस्थळावर यासंदर्भातील सविस्तर माहितीसुद्धा देण्यात आली आहे. पण, प्रवाशांना या सवलतीचा फायदा घेण्यासाठी काही नियम आणि अटींचं पालन करणं मात्र बंधनकारक असणार आहे.


नियम आणि अटी खालीलप्रमाणं...




  • प्रवासी भारतीय नागरिक असणं अपेक्षित.

  • प्रवाशाचं वय ६० वर्षांहून अधिक असावं.

  • प्रवाशांकडे वैध ओळखपत्र असणं बंधनकारक. या ओळखपत्रावर जन्मतारीखही नमूद असली पाहिजे.

  • इकोनॉमी केबिन बुकींग श्रेणीअंतर्गत मूळ तिकीट दराच्या ५० टक्के रक्कम बंधनकारक.

  • फ्लाईटच्या डिपार्चरपूवी तीन दिवसांआधी तिकीट काढलेली असावी.

  • भारतात कोणत्याही क्षेत्रात प्रवास करण्यासाठी ही सवलत लागू.

  • लहान मुलांना यामध्ये कोणतीही सवलत नाही.


सध्याच्या घडीला एअर इंडिया ही एक अशी विमानसेवा पुरवणारी कंपनी आहे, जी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाली आहे. सध्याच्या घडीला एकट्या एअर इंडियावर ६० हजार कोटी रुपयांहूनही जास्त किंमतीचं कर्ज आहे. याच कर्जातून मुक्त होण्यासाठी कंपनीही विकली जात आहे. तोट्यात असणाऱ्या या कंपनीच्या दृष्टीनं आता तिचं पूर्णपणे खासगीकरण करण्यासाठी केंद्राकडून पावलं उचलली जात आहेत.