मुंबई : गेल्या दहा दिवसात देशात सोन्याचे भाव कमालीचे उतरले आहे. मंगळवारी मुंबईच्या बाजारात सोन्याचा भाव 800 रुपयांनी घसरल्याचं पहायला मिळालंय. मुंबईत बुधवारी सकाळी  22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 43,000 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,000 इतका आहे. 


चांदीच्या दराचा विचार करता एक किलो चांदीचा भाव 66,000 हजार इतका झाला आहे. अमेरिकन बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालंय. सोन्याच्या भावात 12.24 डॉलर अर्थात 0.70 टक्के घसरण झाल्याचं पहायला मिळालंय तर चांदीच्या भावात 0.97 डॉलर अर्थात 3.69 टक्के घसरण झाली आहे. 


मागील वर्षी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी 56 हजार रुपये प्रती तोळा अशी विक्रमी किंमत गाठली होती. आता मात्र अनेक देशांचा किंबहुना भारताचाही आर्थिक गाडा वेग धरु लागलेला असताना दर कमी होणं, ही बाब अनेकांना थक्क करणारी आहे. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात सोन्याच्या खरेदीत वाढ होताना दिसत आहे. 


कोरोना लसीकरणाच्या सत्राला सुरुवात झालेली असतानाच सोन्याचे दर मात्र कमीच होत आहेत. अमेरिकन बॉण्ड यील्डमध्ये झालेली वाढ हेसुद्धा यामागचं एक कारण ठरत आहे. जगभरातील गुंतवणुकदार अमेरिकन बॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं आहे, परिणामी याचे पडडसाद दरांवर उमटले आहेत.


सोन्याच्या दरांत कपात झाल्यामुळं गेल्या काही काळापासून यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुख्य म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांनी प्रती 10 ग्रामसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता.


अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा गुंतवणुकीचा पर्याय. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. सोन्याच्या दरात झालेली तब्बल 12 हजार रुपयांची घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे. 


संबंधित बातम्या :