राजकोट (गुजरात) : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. अधिकाधिक लोकांनी कोरोना लस घ्यावी यासाठी सरकारसह इतर लोकही पुढाकार घेत आहे. कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गुजरातच्या राजकोटमधील स्वर्णकार समाजाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. लसीकरण कॅम्पमध्ये येणार्‍या लोकांना विशेष भेटवस्तूही दिल्या जात आहेत. 


स्वर्णकार समाजाच्या वतीने राजकोट शहरात कोरोना लसीकरण शिबिर सुरु करण्यात आलं आहे. या शिबिरात लसीकरण करणार्‍या महिलांना सोन्याचे नोझपिन (नथ) देण्यात येत आहे. त्याचवेळी लस घेणाऱ्या पुरुषांना भेटवस्तूमध्ये हॅण्ड ब्लेंडर देण्यात येत आहे. राजकोटच्या स्वर्णकार समुदायाने भेटवस्तू जाहीर केल्यापासून नागरिकांनी या शिबिरात गर्दी केली आहे. 


राजकोटच्या सोनी समाजाच्या सहकार्याने राजकोट नगरपालिकेद्वारे किशोर सिंहजी प्राथमिक विद्यालय, कोठारिया नाका, सोनी बाजारात शुक्रवार आणि शनिवारी नि:शुल्क कोरोना टीकाकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. इस शिबिरात शुक्रवारी 751 आणि शनिवारी 580 जणांना लस देण्यात आली.


अशाचप्रकारचा उपक्रम मेहसानामध्येही राबवण्यात आला होता. इथेही लस घेणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या होत्या. मेहसानाच्या एका कार वर्कशॉपमध्ये कोरोना लसीचं प्रमाणपत्र घेऊन आल्यास त्यांना त्यांच्या कारच्या जनरल सर्विसमध्ये लेबर चार्ज घेतला जात नाही. तसंच कार अॅक्सेसरीजवर 10 टक्के सूट दिली जात आहे. ही ऑफर  कोरोना लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी देण्यात येत आहे.