पणजी : हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांनी अवयवदान करावं, असा उपरोधिक सल्ला गोव्याचे पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दिला. कितीही विरोध झाला, तरी राज्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


गोव्यात सध्या ट्राफिक सेंटिनल योजनेवरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या आमदारांनीही या योजनेला जोरदार विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात पोलिस महासंचालकांनी ट्राफिक सेंटिनल योजनेला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला.

ताज्या आकडेवारीनुसार राज्यात घडलेल्या अपघातात हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. याउलट हेल्मेट घातल्यामुळे अपघातग्रस्त झालेले अनेक दुचाकीस्वार बचावले आहेत, याकडे महासंचालकांनी लक्ष वेधलं.

दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. ज्यांनी हेल्मेटचा वापर करायचाच नाही, असं ठरवलं आहे, त्यांनी अवयवदानासाठी नावनोंदणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. गोमंतकीयांची डोकी लोखंडाची बनलेली असतील तर त्यांनी हेल्मेट  घालू नये असा उपरोधिक सल्ला आदल्याच दिवशी चंदर यांनी दिला होता.

सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा ट्राफिक सेंटिनल योजनेला असलेला विरोध मोडून काढण्यासाठी पोलिस महासंचालक जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी याबाबत फेरविचार करण्याचं आश्वासन दिलं आहे.