पणजी: महाराष्ट्रानंतर आता गोव्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून गोवा काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडणार असल्याची शक्यता आहे. आता गोव्यातही महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता असून काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदार वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. त्यावर काँग्रेसने आता कारवाई करत मायकल लोबो यांना गटनेतेपदावरुन आणि विरोधी पक्षनेतेपदावरुन हवटलं आहे. 


मायकल लोबो आणि दिगंबर कामत या दोघांनी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले असल्याचा आरोप गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. या दोन्ही नेत्यांविरोधात आता कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मायकल लोबो यांना काँग्रेस गटनेतेपदावरून हटवण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. दिनेश गुंडू राव यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली असून त्यावेळी काँग्रेसचे पाच आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. 


 




गोवा विधानसभेच्या मान्सून सेशनला उद्यापासून सुरुवात होणार असून त्याच्या आधीच काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांनी वेगळा गट तयार करण्यासाठी हालचाली सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेस गुंडू राव यांनी वकिलांसोबत चर्चा सुरू केली असून या बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 


गोवा काँग्रेसमधील फूट अटळ असल्याचं चित्र आहे. गोव्यातील काँग्रेसचे एक-एक आमदार आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संपर्कात येत आहेत. विरोधी पक्ष नेते मायकल लोबो, काँग्रेस आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. 


गोव्यातील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश असून ते देखील भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे. यापूर्वी 2019 मध्येही काँग्रेसला धक्का देत अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की काय? अशा चर्चांनी जोर धरला आहे. दिगंबर कामत, मायकल लोबो, युरी आलेमाओ, संकल्प आमोणकर, डेलाला लोबो, अॅलेक्स सिक्कारो, केदार नायक आणि राजेश फळदेसाई काँग्रेसमधील हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.