पणजी: महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही राजकीय घडामोडींना वेग आला असून गोव्यातही महाराष्ट्राचा फॉर्म्युला अंमलात येण्याची शक्यता आहे. गोवा काँग्रेसमधील 11 पैकी आठ आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वत:चा एक गट करण्याच्या तयारीत आहेत. ते भाजप सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. 


महाराष्ट्रात ज्या प्रमाणे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्ष न सोडता स्वत:चा एक गट तयार केला आणि त्यांनी भाजपच्या मदतीने सरकार बनवलं. आता याची पुनरावृत्ती गोव्यातही होण्याची शक्यता असून गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आमदारांचा हा गट गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव पुढील कार्यवाहीसाठी आज दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत. 


गोवा काँग्रेसमधील 11 पैकी आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्यात आता ही ताजी अपडेट येत आहे. पण काही केलं तरी काँग्रेसमधील फूट अटळ असल्याचं चित्र आहे. गोव्यातील काँग्रेसचे एक-एक आमदार आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संपर्कात येत आहेत. विरोधी पक्ष नेते मायकल लोबो, काँग्रेस आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. 


गोव्यातील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश असून ते देखील भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे. यापूर्वी 2019 मध्येही काँग्रेसला धक्का देत अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की काय? अशा चर्चांनी जोर धरला आहे. दिगंबर कामत, मायकल लोबो, युरी आलेमाओ, संकल्प आमोणकर, डेलाला लोबो, अॅलेक्स सिक्कारो, केदार नायक आणि राजेश फळदेसाई काँग्रेसमधील हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.