Goa Political Crisis : सध्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्त्वात काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा सुरु असून गोव्यात (Goa Politics) मात्र भाजपनं (BJP) ऑपरेशन 'काँग्रेस तोडो' यशस्वी केलं आहे. गोव्यात अखेर काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आलं आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेशे केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या अवघ्या एक वर्षाच्या आतच गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे.
भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये केलेल्या दाव्यानंतर गोव्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सदानंद तावडे यांनी ट्वीटमध्ये केला होता. त्यानंतर गोव्यात काँग्रेसला मोठा हादरा बसणार हे जवळपास निश्चितच झालं होतं. त्यानुसार, आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
जुलै महिन्यातच हालचाली सुरु
जुलै महिन्यात गोव्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. जुलै महिन्यातच काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आलं होतं. भाजप काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. त्यावेळी काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावरून मायकल लोबो यांची हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची ऑफर दिली जात असल्याचा आरोपही काँग्रेसनं त्यावेळी केला होता.
काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 11 जागांवर विजय मिळाला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली होती. काँग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. भाजपमध्ये सामिल होणाऱ्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश होता. दिगंबर कामत हे काँग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात. त्यांनीही काँग्रेसची साथ सोडल्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसल्याचं बोललं जात आहे.
गोव्यातील संख्याबळ काय?
गोवा विधानसभेत सध्या भाजपकडे 20 आमदार आहेत. तर, काँग्रेसकडे 11 जागा आहेत. त्याशिवाय, महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाकडे दोन, गोवा फॉरवर्ड पक्षाचा एक आमदार आहे. तर, अन्य पक्षांकडे सहा जागा आहेत. काँग्रेसचे आठ आमदार भाजपात सामिल झाल्यास काँग्रेसकडे तीन आमदार शिल्लक राहतील.