पणजी : गोवा राज्य सरकारचं काम ठप्प झालं असून प्रशासन ढिम्म झाल्याची टीका विरोधक करत असतानाच मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विरोधकांना आपल्या कृतीतून उत्तर दिलंय. आजारी असूनही पर्रिकर आज बाहेर पडले आणि त्यांनी पणजीतल्या तिसऱ्या मांडवी पुलाच्या कामाची पाहणी केली.


आजारी असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या मनोहर पर्रिकरांचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या फोटोत मनोहर पर्रिकर नाकात ड्रिप असतानाही पुलांची पाहणी करताना दिसत आहेत. रविवारी त्यांनी जुआरी ब्रिज आणि तिसऱ्या मांडवी ब्रिजचे निरीक्षण केले.


यावरुन भाजप नेत्यांककडून हे समर्पण आणि वचनबद्धतेचं एक उत्तम उदाहरण आहे, अशा शब्दात कौतुक केलं जात आहे तर विरोधकांना मात्र भाजप अशा अवस्थेतही पर्रिकरांना काम करण्याची जबरदस्ती करत असून हे अत्यंत अमानवीय आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर 14 ऑक्टोबरला नवी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर पहिल्यांदाच ते समोर आले. 63 वर्षीय पर्रिकरांनी रविवारी मंडोरी आणि जुआरी पुलाचं काम पाहिलं.  कित्येक महिन्याच्या कालावधीनंतर पर्रिकर मांडवी येथील पुलाची पाहाणी करताना दिसून आले. त्यावेळी त्यांच्या नाकात ड्रिप असल्याचे दिसून आले. मनोहर पर्रिकरांच्या अनुपस्थितीमुळे गोवा सरकार आणि प्रशासनाचं संपूर्ण काम ठप्प झालं असल्याची टीका वारंवार काँग्रेसकडून केली जात आहे.

विरोधी पक्ष काँग्रेस आणि स्वयंसेवी संघटनांनी मुख्यमंत्री आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाले असून त्यांनी विश्रांती घेऊन दुसऱ्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवावे अशी मागणी केली होती. सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानावर मोर्चा देखील काढला होता.

दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री फक्त फोटोमधून जनतेला दर्शन देत होते. सभापती प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या भेटी बरोबरच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बैठक आणि मंत्रीमंडळ बैठकीचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले होते.


काल बऱ्याच दिवसांनी मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत नवा फोटो सीएमओने प्रसिद्ध केला होता. पहिल्या 3 फोटोंमध्ये मुख्यमंत्री सोफ्यावर बसलेले तर कालच्या फोटोत ते उभे राहून एनआयटी गोवाच्या कायमस्वरूपी संकुलाच्या पायभरणी शिलेचे अनावरण करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आजारी असल्याने घराबाहेर पडू शकत नसल्याने कार्यक्रम त्यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी करण्यात आला होता.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आजारपणामुळे सरकार ठप्प झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत मुख्यमंत्री पर्रिकर यांनी घराबाहेर पडून पणजी येथील तिसऱ्या मांडवी पुलाच्या कामाची पाहणी करून विरोधकांची तोंडे बंद केल्याचे मानले जात आहे.


दुपारी 3 च्या सुमारास मुख्यमंत्री आपल्या कारने घराबाहेर पडले. त्यांनी पर्वरीच्या बाजूने येत मेरशीपर्यंत पुलाच्या कामाची पाहणी केली. मांडवीचा तिसरा पुल हा पर्रिकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 12 जानेवारी रोजी त्याचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आजच्या फोटोत त्यांच्या नाकात सलाईन घेऊन असल्याचे दिसत आहेत. त्यांच्या मागे त्याचे खाजगी सचिव काहीतरी धरून उभे असल्याचे दिसत आहेत. यापूर्वी ही सलाईन दिसू नये, यासाठी त्यांचे एका बाजूने फोटो प्रसिद्ध केले जात असल्याची चर्चा होती. आज ती सलाईन फोटो मध्ये स्पष्टपणे दिसत आहे.