नवी दिल्ली : 1984 मधील शीख दंगली प्रकरणी दिल्लीतील हायकोर्टाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. या सुटकेला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या खटल्यात आज हायकोर्टाने निर्णय दिला. हायकोर्टाने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शीखविरोधी दंगल भडकली होती. दंगलीत 3 हजारपेक्षा अधिक शीख नागरिकांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेस नेत्यांच्या चिथावणीमुळेच ही दंगल भडकली, असा आरोप आहे.


सज्जन कुमार यांच्यावर दंगल भडकविल्याचा आरोप आहे. सज्जन कुमार हे तीन वेळा खासदार राहिलेले आहेत. सज्जन कुमार यांना 31 डिसेंबर 2018 पूर्वी शरण येण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

सज्जन कुमारसह कॅप्टन भागमल, गिरीधारी लाल आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक बलवान खोखार या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर किशन खोखार आणि महेंद्र यादव या दोघांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

शीखविरोधी दंगलीप्रकरणी आता अखेर 34 वर्षांनंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. षडयंत्र रचने, हिंसा घडवून आणणे आणि दंगली भडकवण्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे असून तब्बल 34 वर्षानंतर सज्जन कुमार यांना शिक्षा ठोठावण्यात आली. याप्रकरणात इतरही काही काँग्रेस नेत्यांवर आरोप आहेत.