नवी दिल्ली: आपल्या चार दशकांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीनंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त झाले. संसदेत त्यांच्याबद्दल आठवण सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर गुलाम नबी आझाद आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरु झाली.


स्वत: गुलाम नबी आझादांनी आता या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, "ज्यावेळी काश्मीरात काळा बर्फ पडायला सुरुवात होईल त्यावेळी मी भाजपमध्ये प्रवेश करेन." या उत्तराने गुलाम नबी आझादांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचं सांगण्यात येतंय.


गुलाम नबी आझादांची चाळीस वर्षाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांच्याबद्दल एक आठवण सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. आपल्या भाषणात त्यांनी गुलाम नबी आझादांची स्तुती करुन त्यांना सलाम केला होता. त्यानंतर गुलाम नबी आझाद लवकरच आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरु झाली होती.


PM Modi's Emotional Speech in RS : राज्यसभेत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर, म्हणाले...


गुलाम नबी आझादांनी आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीपैकी 28 वर्षे राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी राज्यसभेतील काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं आहे, तसेच काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलंय.


गुलाम नबी आझाद म्हणाले की, "ज्यावेळी काश्मीर मध्ये काळा बर्फ पडेल त्यावेळी मी भाजप किंवा इतर पक्षात प्रवेश करेन. जे लोक या प्रकारची अफवा पसरवतात त्यांना माझ्याविषयी काही माहित नसल्याचं दिसतंय. जेव्हा राजमाता सिंधिया विरोधी पक्षाच्या उपनेत्या होत्या त्यांनी माझ्यावर काही आरोप ठेवले होते. त्यावेळी मी अशी मागणी केली की अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि राजमाता सिंधिया यांची एक समिती तयार करावी आणि त्यांनी माझ्यावरील आरोपांची शहानिशा करावी. ते जो निर्णय देतील तो मला मान्य असेल. त्यावर वाजपेयी म्हणाले होते की मी गुलाम नबी आझादांना चांगलं ओळखतो, राजमाता सिंधिया त्यांना ओळखत नाहीत."


गुलाम नबी आझादांनी ते भाजपात जाणार नाहीत हे स्पष्ट केलं असलं तरी दिल्लीच्या वर्तुळात आणि माध्यमांमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. भाजपमध्ये त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल, त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार बनवण्यात येईल किंवा एखाद्या महत्वपूर्ण राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा आहे.


इंग्रजांनाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते! गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारला सांगितली आठवण