Gaziabad: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये (Gaziabad) एलईडी टीव्हीचा ब्लास्ट झाल्यानं एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्या मुलाची आई आणि एक मित्र या ब्लास्टमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादमधील टीला मोड पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी ही घटना घडली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस या प्रकरणाचा तपासणी करत आहेत.
LED टीव्हीमध्ये स्फोट झाल्याची ही घटना गाझियाबादच्या टीला मोड पोलीस स्टेशन परिसरातील हर्ष विहारमध्ये घडली. रहिवासी निरंजन यांचा 16 वर्षीय मुलगा करण हा त्याच्या मित्रासोबत घरात एलईडी टीव्हीवर कार्यक्रम पाहत होता. यादरम्यान करणची आई ओमवतीही तेथे पोहोचली.अचानक एलईडी टीव्हीचा जोरात स्फोट झाला. तेथे उपस्थित असलेले तिघेही जखमी झाले. स्फोट झाल्यानंतर टीव्ही ज्या भिंतीवर लावला होता ती भिंत तुटली.
उपचारादरम्यान करणचा मृत्यू
ब्लास्टचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक करणच्या घरामध्ये आले. त्यावेळी त्यांनी करणची आई ओमवती, त्याचा मित्र ओमेंद्र आणि करण यांना जखमी अवस्थेत दिसले. ब्लास्टचा आवाज एवढा मोठा होता की, अजूबाजूच्या लोकांना वाटले एखाद्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे. त्यानंतर जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान करणचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिली माहिती
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलीस हे सध्या अपघाताच्या कारणाची तपासणी करत आहेत. मात्र, टीव्हीचा स्फोट होण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. एलईडी टीव्हीचा स्फोट हाय व्होल्टेजमुळे झाल्याचा संशय आहे. या घटनेनंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घराची पाहणी केली.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
'घरात इतर कोणतीही ज्वलनशील वस्तू नव्हती. घरातील एलईडी टेलिव्हिजन हे एकमेव उपकरण होते ज्याचा स्फोट झाला.', अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या आघातामुळे, ज्या खोलीत टीव्ही ठेवण्यात आला होता. त्या संपूर्ण खोलीला तडे गेले आणि नुकसान झाले, असे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कुमार सिंह यांनी सांगितले.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्य: