Monkeypox : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स रोगाचा संशयित रुग्ण भारतात आढळला आहे. दिल्लीजवळील गाझियाबादमधील एका पाच वर्षीय मुलींमध्ये मंकीपॉक्स रोगाची लक्षणे आढळली आहेत. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय मुलींमध्ये मंकीपॉक्स रोगाची लक्षणे आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या मुलीचे नमुने तात्काळ घेण्यात आले असून टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. पाच वर्षीय मुलीच्या त्वचेला खाज येत आहे. तसेच तिच्या शरीरावर व्रणही दिसून येत आहेत.  


गाझियाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे नमुने तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात आले आहेत. पुढील 24 तासांत तपासणीचा अहवाल येईल. सध्या पाच वर्षीय चिमुकलीला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच या मुलीमध्ये आढळून आलेली लक्षणे इतर आजाराचीही असू शकतात... पण खबरदारी घेत तीला विलगीकरणात ठेण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.  


प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या पाच वर्षाच्या चिमुकलीने अथवा तिच्या कुटुंबियांनी मागिल महिन्याभरात विदेशवारी केलेली नाही, अथवा विदेशातून त्यांच्याकडे कुणी आलेलं नाही.  त्या चिमुकलीमध्ये मंकीपॉक्स रोगाची लक्षणे आढळली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कानासंदर्भातील आजाराच्या उपचारासाठी 23 मे रोजी पाच वर्षीय चिमुकली ईएनटी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी डॉक्टरांना त्या चिमुकलीच्या त्वचेवर जास्त पुरळ आणि खाज यासारख्या गोष्टी निदर्शणास आल्या. डॉक्टरांनी याची गंभीर दखल घेत याची माहिती सरकारी रुग्णालयात पोहचवली. त्यानंतर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत, त्या मुलीचे नमुणे तपासणीसाठी पाठवले आहेत.  


मंकीपॉक्स रोगाची काय आहेत लक्षणे?
तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.


संक्रमणाचा धोका किती?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रीय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.