Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील कानवानी गावात आग लागून सुमारे 40 गायींचा मृत्यू झाला आहे. कचऱ्याच्या गोदामाला ही आग लागली. त्यानंतर गोदामाशेजारील वस्तीला लागून असलेल्या गोशाळेत ही आग पसरली. आज दुपारी ही घटना घडली आहे.  


गाझियाबाद शहराच्या एएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी  एक वाजून 10 मिनिटांच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या सुमारे 15 गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. जपळपास एक तासानंतर  ही आग नियंत्रणात आली. परंतु, तोपर्यंत या आगित 40 गायींचा मृत्यू झाला होता.  


मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश गायी बांधलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना गोठ्यातून बाहेर काढता आले नाही.  आगीची घटना घडली त्यावेळी गोशाळेत एक कर्मचारी उपस्थित होता. त्याने इतर काही लोकांच्या मदतीने काही गायी बाहेर काढल्या. या घटनेत 20 गायी जखमी झाल्या आहेत.  


दरम्यान, गाझियाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोबतच प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करण्यास सांगितले असून ही झोपडपट्टी कोणत्या परिस्थितीत वसली याचीही चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. कारण आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की, या वस्तीत रद्दीचे कोठारही होते. या संदर्भात अनेकवेळा पोलीस आणि प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. 


गोशाळेचे संचालक सूरज पंडित यांनी सांगितले की, " आज दुपारी फोनवरून गोशाळेत आग लागल्याची माहिती मिळाली. त्यावेळी गोठ्यात एक कामगार उपस्थित होता. त्याने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने गायी बाहेर काढल्या. परंतु, आग इतकी वेगाने पसरली की सर्व गायींना बाहेर काढणे कठीण होते."


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या