मुंबई : जॉर्जियामध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या 11 भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूची गळती झाल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. जॉर्जियातील भारतीय दूतावासाने यासंबंधी एक निवेदन जारी केलं आहे. ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून मृत नागरिकांचे प्रेत भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. जॉर्जियातील गुडौरी या परिसरातील एका माऊंटन रिसॉर्टमध्ये ही घटना घडली असून त्यामध्ये एकूण 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक नागरिक स्थानिक असून इतर 11 नागरिक हे भारतीय आहेत.
जॉर्जियाची राजधानी, तिबिलिसी येथील भारतीय दूतावासाने 11 भारतीय नागरिकांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारतीय दूतावासाने म्हटलं आहे की, दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत असून मृतदेह लवकरच भारतात पाठवले जातील.
कार्बन मोनॉक्साईडमुळे गुदमरून मृत्यू
स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्वांचा मृत्यू हा कार्बन मोनॉक्साईडमुळे झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही बाब पुढे आली आहे. रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बेडरूमजवळ पॉवर जनरेटर ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासास समोर आली आहे. लाईट गेल्यानंतर या जनरेटरचा वापर करण्यात आला होता आणि त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड संपूर्ण रुममध्ये पसरला. त्यामुळेच सर्वाचा गुदमरून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
जॉर्जिया पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या रिसॉर्टवर फॉरेन्सिक तज्ज्ञांची एक टीम पोहोचली असून मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर बंदिस्त ठिकाणी जनरेटरच्या वापराबाबत प्रश्न उभे केले जात आहेत.