नवी दिल्ली : नोटबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्याचं सरकारी आकड्यांमधूनच स्पष्ट झालेलं आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा निदर्शक मानल्या जाणाऱ्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे आज सरकारनं जाहीर केले आहेत. त्यानुसार नोटबंदीच्या 2016-17 या आर्थिक वर्षात विकास दर 7.1 टक्के राहिला होता. याआधी 205-16 या आर्थिक वर्षात विकास दर 8 टक्के इतका होता. त्यामुळे गत आर्थिक वर्षात तो जवळपास 0.9 टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसतं आहे.


8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी झाल्यानंतर चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च 2017 या काळात अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याचंही दिसतं आहे. कारण या शेवटच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर आणखी खालावून 5.6 टक्क्यापर्यंत पोहचल्याचं दिसतं आहे. मागच्या वर्षी याच काळात म्हणजे शेवटच्या तिमाहीत हा दर 8. 7 टक्के होता हे विशेष. 2016-17 या आर्थिक वर्षातली सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे कृषी विकासदरातली प्रचंड वाढ.

नोटबंदीनंतर इतर सर्व क्षेत्रात विकास दर खालावला असला तरी केवळ कृषी क्षेत्रातच आशादायक स्थिती दिसली. मागच्या वर्षी 1.5 असलेला विकासदर यावेळी थेट 5.2 टक्क्यांवर पोहचलाय. सततच्या दुष्काळानंतर मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं कृषी विकासदरात त्याचा परिणाम दिसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. नोटबंदीनंतर जीडीपी किमान दोन टक्क्यांनी खालावेल अशी भीती देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली होती.

नोटबंदीच्या एका निर्णयानं देशातलं 87 टक्के चलन हे एका झटक्यात बाद झालेलं होतं. पायाभूत निर्मिती, उत्पादन क्षेत्रावर या निर्णयाचा त्याचा परिणाम होणार हे भाकित अनेक संस्थानींही वर्तवलं होतं. आज अर्थव्यवस्थेच्या वाढीचे जे आकडे समोर आलेत, त्यानुसार जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हा भारताच्या वाट्याला आलेला मानही हिरावला गेला. कारण नोटबंदीनंतरच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा चीनच्या तुलनेत कमी असल्याचं दिसतं.