लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते आणि अखिलेश सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापती यांना गँगरेप प्रकरणी अटक झाली आहे. लखनौमधून प्रजापती यांना अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली. गायत्री प्रजापती यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अखिलेश सरकारमध्ये मंत्री राहिलेले गायत्री प्रजापती आणि इतर सहा जणांवर एका महिलेवर गँगरेप केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायत्री प्रजापती फरार होता.

उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावेद अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री प्रजापती फरार असताना काही दिवस दिल्लीजवळ, तर त्यानंतर काही दिवस हरियाणाजवळ राहत होते. लखनौहून आज सकाळीच प्रजापती यांना अटक करण्यात आली.

गँगरेप प्रकरणात प्रजापती यांच्यासोबत आरोपी असलेले अमरेंद्र उर्फ पिंटू, रुपेश्वर आणि विकास वर्मा यांना लखनौमधील हजरतगंज परिसरातून 14 मार्चला अटक करण्यात आली होती. या गँगरेप प्रकरणात गायत्री प्रजापती यांचे गनर चंद्रपाल, लेखापाल अशोक तिवारी आणि आरोपी आशिष शुक्ला यांनाही याआधी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

सहा महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने गायत्री प्रजापती यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय दिला होता. शिवाय, सुप्रीम कोर्टाने प्रजापती यांची याचिकाही फेटाळली होती. या याचिकेतून प्रजापती यांनी अटकेतून सुटका मिळावी, अशी मागणी केली होती.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शाह म्हणाले होते, सरकार आल्यावर सर्वात आधी गायत्री प्रजापतीला तुरुंगात पाठवू.

प्रकरण काय आहे?

गायत्री प्रजापती यांच्यावर गँगरेपचा आरोप करण्यात आल्यानंतर पोलिसांनी 17 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली, तीही सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर. धक्कादायक म्हणजे गँगरेपची तक्रार दाखल झाल्यानंतरही 27 फेब्रुवारीला अमेठीमधील मतदारसंघात फिरताना दिसला होता. मात्र, पोलिस सांगत होते की, प्रजापती फरार आहे.

पीडित महिलेवर गँगरेप केल्यानंतर, तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न प्रजापती आणि इतर आरोपींनी केला होता. समाजवादी पक्षाच्या तिकिटावर अमेठीमधून लढले होते. मात्र, ते पराभूत झाले.