पणजी (गोवा) : सुप्रीम कोर्टाने मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांनी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही हजर होते. विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ 21 वर आलं. दुसरीकडे मुख्यमंत्री झालेल्या पर्रिकर यांना उद्या बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एबीपी माझान मनोहर पर्रिकर यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली, ज्यात पर्रिकरांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.


प्रश्न : यावेळी मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग सोपा होता की कठीण?

मनोहर पर्रिकर : मार्ग मी निवडलाच नाही. आमचे जे सहकारी आहेत त्यांनी मार्ग निवडला आहे. त्यांनीच भाजपला पत्र दिलंय की, जर पर्रिकर मुख्यमंत्री होत असतील, तर आम्ही तुमच्यासोबत सरकार बनवू. त्यामुळे मार्ग तर त्यांनीच आम्हाला निवडून दिला आहे. अनेकांना माहित नाहीय की, समर्थन देणारं पत्र दिलंय, त्यामध्ये पहिली अट आहे की, 'We are supporting BJP provided CM in Manohar Parrikar.' मला आनंद वाटला, त्यांनी अशाप्रकारे समर्थन दिलं. त्यांना माझ्यावर विश्वास आहे म्हणून समर्थन दिलं. मग आमच्या पक्षानेही विचार केला की, जर हीच त्यांची अट असेल, तर आपण पाठिंबा घेऊया आणि अर्ध्या तासात निर्णयही झाला. मग पत्रावर सह्या करुन आम्ही राज्यपालांकडे गेलो.

प्रश्न : याच गोष्टीवर प्रश्न विचारले जात आहेत. नैतिकतेचा प्रश्न उपस्थित होत आहे की, लोकशाहीत हे बरोबर आहे का? कारण जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे, त्यांना पक्ष स्थापनेसाठी बोलावण्यात आले नाही.

मनोहर पर्रिकर : सिंगल लार्जेस्ट पार्टीवर कुणीही विश्वास ठेवत नाही. सिंगल लार्जेस्ट पार्टी केवळ वैयक्तिक हितसंबंधांसाठी काम करते. त्यामुळे त्यांच्यावर कुणाचाही विश्वास नाही.

प्रश्न : मात्र आता काँग्रेस म्हणतंय की, पैशांच्या जोरावर सरकार बनवलं.

मनोहर पर्रिकर : त्यांना असं करण्याची सवय आहे. तुम्हाला कावीळ झाली ना की सारं जग पिवळं दिसू लागतं.

प्रश्न : असेही म्हटलं जातंय की, गोवा फॉरवर्डमुळे भीती होती. त्यामुळे सर्वांना मंत्रिपद दिले गेले. एमजीपीचे दोन आणि अपक्ष, असे दोघांनाही मंत्रिपदं दिली. भीती होती की ते काँग्रेसला जाऊन मिळू नयेत? विजय सरदेसाई तर पहिल्यापासून काँग्रेसशी संबंधित होते.

मनोहर पर्रिकर : काँग्रेस त्यांना तीन मंत्रिपदं देऊ शकत नव्हती का? जी मी ऑफर दिली, ती ते देऊ शकत नव्हते का?

प्रश्न : तुम्हाला दिल्लीच आठवण येईल का? तुम्ही संरक्षणमंत्री म्हणून होतात. तुम्ही इकडे आलात, तर अनेकजण म्हणत होते की, तुमचं मन गोव्यात होतं म्हणून तुम्ही परत आलात.

मनोहर पर्रिकर : दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कामाबाबत स्पष्ट करु इच्छितो की, दिल्लीतील कामही आवडत होतं आणि मनापासून करत होतो. मात्र, दिल्लीची हवा, दिल्लीचं वातावरण, जेवण या सर्व गोष्टींमुळे त्रास होत होतं.

प्रश्न : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही व्यासपीठावर येऊन म्हणालात, 50 टक्के व्होट शेअर तुमच्याकडे आहे आणि सर्वांना प्रतिनिधित्त्व मिळालं. म्हणून तुम्हाला मंत्रिपद द्यावं लागलं की अपरिहार्यता होती?

मनोहर पर्रिकर : अपरिहार्यतेचा प्रश्न नाही. आमच्याकडेही पाच ते सहा मंत्री असतील. विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा उपाध्यक्षही आमच्याकडे असतील. त्यामुळे योग्या वाटप झालंय. आम्ही दहाच मंत्रिपदं घेतली आहेत. दोन आणखी वाढतील. तेही आमचेच असतील. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा उपाध्यक्षही आहेतच. तुम्ही संख्येनुसार पाहाल, तर आम्ही योग्यरित्या मंत्रिपदांची वाटणी केली आहे. गेल्यावेळी निवडणुकीआधी युती केली होती. त्यावेळी आमचेच म्हणजे भाजपचेच आमदार 21 होते. भाजपला एकट्याल बहुमत होतं. तरीही आम्ही तीन मंत्री आमच्या सहकारी पक्षांतील आमदारांना दिले. खरंतर तसं करण्याची गरजही नव्हती. आम्ही आमच्याच तीन आमदारांना मंत्री करु शकत होतो. मात्र, 'We keep our word'. भाजप आपला शब्द पाळते, हा संदेश त्यातून गेला. हे त्यांनाही माहित आहे.

प्रश्न : विरोधक म्हणतायेत की, 'मनोहर पर्रिकर कार्ड' फेल झालं होतं. तुमच्याच नावावर निवडणूक लढवली गेली आणि फक्त 13 जागा मिळाल्या.

मनोहर पर्रिकर : निवडणूक तर मी लढवली नाही.

प्रश्न : तुम्ही इथे सर्व सांभाळत तर होतात ना.

मनोहर पर्रिकर : सांभळत तर नक्कीच होतो. मात्र, तुम्ही दुसरी बाजू बघाल आणि नीट विश्लेषण कराल तर लक्षात येईल, आम्हाला 34.5 टक्के मतं, तर काँग्रेसला केवळ 28 टक्के मतं आहेत. त्यात अडीच वर्षे मी इथे नव्हतो. त्यामुळे इथल्या प्रशासनात काहीसा ढिलेपणा आला. ते एक कारण असू शकतं. किंवा लोकांच्या अपेक्षा वाढल्या असतील, हेही कारण असू शकतं. थोडं अनपेक्षित निकाल नक्कीच आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच आहे. आम्हाला त्याचं कारण समजलं आहे. लोकांना बाकी सर्व गोष्टी आवडतात. मात्र, तुमच्यात थोडाही गर्विष्ठपणा आला, तर लोकांमधून प्रतिक्रिया उमटू लागतात.

प्रश्न : तुम्हाला चाणक्य म्हटलं जातं. 22 आमदारांची बांधणी तर तुम्ही केलीच आहे. 23 होतील?

मनोहर पर्रिकर : 23 व्या आमदाराने केवळ पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, तो पाठिंबा आतापर्यंत तर बाहेरुनच आहे.

प्रश्न : 5 वर्षे सरकार चालवाल?

मनोहर पर्रिकर : मी याआधीही चालवलं आहे. किंबहुना, त्यावेळी तर यापेक्षा वाईट स्थिती होती. केंद्रात काँग्रेसचं सरकार असतानाही राज्यात मी अशाप्रकारे सरकार चालवलं आहे.

प्रश्न : पुन्हा गोव्यात आल्याने तुम्ही आनंदी आहात का?

मनोहर पर्रिकर : लेट मी व्हेरी क्लिअर... गोवा माझं आवडतं ठिकाण आहे. त्यामुळे अर्थात मला गोवा आवडतंच. मात्र, असंही नाही की त्यासाठीच मी आलोय. गरज आहे. पक्षानेही सांगितलं. जबाबदारी घेतली.

प्रश्न : पक्षाने पुन्हा दिल्लीत बोलावलं, तर तुम्ही जाऊ शकता का?

मनोहर पर्रिकर : आता ही जबाबदारी घेतल्यानंतर अनावश्यक चर्चांवर लक्ष का देऊ?

VIDEO :