बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येला 22 तास उलटून गेल्यानंतरही मारेकरी मोकाट आहेत. हिंदुत्वाला विरोध केल्यानंच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.


मंगळवारी रात्री 8 वाजता गौरी यांची बंगळुरुतील राजराजेश्वरीनगर भागातील घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदुत्ववादी विचारांना कडवा विरोध केल्यानंच गौरी यांना संपवण्यात आल्याचा आरोप होत आहे.

राहुल गांधी यांनी संघ आणि हिंदुत्ववादी विचारांवर कठोर शब्दात टीका केली आहे. भाजप किंवा संघाच्या विचारसरणीविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो, त्यांना मारहाण केली जाते, हल्ला केला जातो किंवा हत्या केली जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र तपास होईपर्यंत थांबण्याची सूचना केली आहे.

https://twitter.com/ANI/status/905317290823917568

https://twitter.com/ANI/status/905317405072678912

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली? चौकशीसाठी SIT ची स्थापना


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही कर्नाटक सरकारकडून गौरी लंकेश हत्येचा अहवाल मागवण्याचे आदेश गृहसचिवांना दिला आहे. कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर हत्येत समान हत्यारं वापरण्यात आली, मात्र गौरी लंकेश यांच्या हत्येत तीच पद्धत वापरण्यात आली का, हे अद्याप समजू शकलेलं नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

गौरी यांच्या हत्येच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली, बंगळुरु, मुंबई, पुणेसह देशाच्या विविध भागात निषेध मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या दिग्गजांनी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला. ट्विटर, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवरही गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन घमासान चर्चा सुरु आहे.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या


गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर बंगळुरुमध्ये चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तसंच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.

कोण होत्या गौरी लंकेश ?

गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.

गौरी यांच्याविरोधात गेल्यावर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता.

2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.

2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाडमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे.