नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने तेरा वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली आहे. पीडित तरुणी 31 आठवड्यांची गर्भवती आहे.

मेडिकल रिपोर्टनुसार, बाळ आणि आई दोघांच्याही जीवाला धोका आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पीडित तरुणीला गर्भपाताची परवानगी दिली आहे.

येत्या 8 सप्टेंबरला पीडित तरुणीचा गर्भपात होणार आहे.

याआधीच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने पीडित तरुणीच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं मेडिकल बोर्ड गठित केलं होतं. त्या मेडिकल बोर्डाच्या रिपोर्टनंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.

दरम्यान, भ्रूणाची 20 आठवड्यांहून अधिक वाढ झाली असल्यास गर्भपाताला कायदेशीर बंदी आहे. सुप्रीम कोर्टाने 28 जुलैला 10 वर्षीय अल्पवयीन गर्भवतीला भ्रूणाची 32 आठवड्यांची वाढ झाली असतानाही गर्भपाताला परवानगी नाकारली होती. 17 ऑगस्टला याच मुलीने चंदीगडमध्ये बाळाला जन्म दिला.