नवी दिल्ली : गँबिया (Gambia) या देशात कफ सिरपच्या (Cough syrup) सेवनामुळे 66 मुलांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. या कफ सिरपची निर्मिती भारतातील मेडेन फार्मा (Maiden Pharmaceuticals Limited in Haryana) या कंपनीकडून केली जात असली तरी त्याची विक्री मात्र भारतात केली जात नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या कंपनीतून निर्मिती होणारे कफ सिरप हे गॅंबियाला निर्यात केलं जायचं. भारतात तयार होणाऱ्या या कफ सिरपचे सेवन केल्यानंतर गॅंबिया या देशातील 66 मुलांचा मृत्यू झाला होता. भारतीय औषधं नियंत्रक मंडळाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जारी केलेल्या प्राथमिक अहवालात असं म्हटलं होतं की, मेडेन फार्माकडून तयार करण्यात आलेल्या चार प्रकारच्या कफ सिरपमुळे गँबियातील 66 मुलांचा मृत्यू झाला आहे. या कंपनीचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. या चार प्रकारच्या सिरपची निर्मिती जरी भारतात होत असली तरी त्याची विक्री मात्र देशात केली जात नसल्याचं ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्टचे अध्यक्ष राजीव सिंघल यांनी म्हटलं आहे. 


या चार कफ सिरपवर WHO चा आक्षेप 


गँबियातील मुलांच्या मृत्यूसाठी ज्या चार कफ सिरपवर जागतिक आरोग्य संघटनेनं आक्षेप घेतला आहे त्यामध्ये प्रोमेथोजिन ओरल सोल्यूशन, मॅग्रीप एन कोल्ड सिरप, कोफेक्समॅलिन बेबी कफ सिरप आणि मकॉफ बेबी कफ सिरप यांचा समावेश आहे. या औषधांमध्ये आरोग्याला घातक असे काही घटक असल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेने याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. 


हरयाणा ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनकडून या कफ सिरपची निर्मिती करण्याची परवानगी देण्यात आली होती. या औषधांची निर्यात केवळ पश्चिम आफ्रिकेतील गँबिया या देशात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 


भारत सरकारकडून चौकशीचे आदेश 


गँबियातील या दुर्दैवी घटनेनंतर भारतीय औषधं नियामक मंडळाने कडक पाऊले उचलत मेडेन फार्माच्या कफ सिरपची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या संबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून अतिरिक्त माहिती मागवण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :