G-20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) पुढील आठवड्यात इंडोनेशियातील (Indonesia) 17 व्या G - 20 शिखर परिषदेला 2022 मध्ये सहभागी होणार आहेत. 17 वी G - 20 शिखर परिषद इंडोनेशियामधील बाली शहरात आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी पंतप्रधान मोदी यांना या परिषदेचे निमंत्रण दिले आहे. खास बाब म्हणजे शिखर परिषदेच्या समारोपाच्या सत्रात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रतीकात्मकपणे G20 चे अध्यक्षपद पंतप्रधान मोदींना सुपूर्द करतील.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बाली शिखर परिषदेदरम्यान 'रिकव्हर टुगेदर, रिकव्हर स्ट्राँगर' या शिखर परिषदेच्या थीम अंतर्गत G-20 नेते जागतिक चिंतेच्या प्रमुख मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करतील. G-20 शिखर परिषदेच्या अजेंड्याचा भाग म्हणून अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्य आणि डिजिटल परिवर्तन या विषयावर तीन कामकाजाची सत्रे आयोजित केली जातील.
1 डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. भारताने यासाठी एक खास वेबसाइट आणि लोगोही जारी केला आहे. ज्यावरून भारतात वाद सुरू आहे. G-20 च्या अध्यक्षपदाशी संबंधित अधिकृत लोगोमध्ये कमळ जोडून सरकारने याला राजकीय स्वरूप दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. पीएम मोदी बालीमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
भारताला अध्यक्षपदाची संधी
G20 चे अध्यक्षपद भारताला आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक कार्यक्रमात योगदान देण्याची अनोखी संधी आहे. सरकारचे म्हणणे आहे की, भारताच्या G20 अध्यक्षपदाचा लोगो, थीम आणि वेबसाइट भारताचा संदेश आणि जगासाठी व्यापक प्राधान्यक्रम दाखवतो. G20 अध्यक्षपदाच्या काळात भारत 32 विविध क्षेत्रात सुमारे 200 बैठका आयोजित करेल. पुढील वर्षी होणारी G20 शिखर परिषद भारताने आतापर्यंत आयोजित केलेल्या उच्च-प्रोफाइल आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांपैकी एक असेल. भारतात होणारी व्या G - 20 शिखर परिषद ही 18 वी शिखर परिषद असणार आहे.
रशिया-युक्रेन युद्ध आणि महागाईमुळे भू-राजकीय तणाव वाढत असताना भारत राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहे. उदयोन्मुख बाजारपेठा आणि रुपयासह चलने कमकुवत होण्याव्यतिरिक्त इंधनाच्या वाढत्या किमती तसेच बेरोजगारी ही प्रमुख जागतिक चिंता म्हणून उदयास येत आहेत.
महत्वाच्या बातम्या