G20 Summit 2023: दोन दिवसीय G20 शिखर परिषदेत (G20 Summit 2023) सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते आणि जागतिक संस्थांचे प्रमुख शनिवारी (9 सप्टेंबर) राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक नेत्यांचं स्वागत केलं.
यानंतर, 'वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर' या थीमवर आधारित सकाळी 10.30 वाजता G20 शिखर परिषदेचं पहिलं सत्र सुरू झालं. परिषदेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. दिल्लीच्या जाहीरनाम्यालाही संपूर्ण परिषदेने मान्यता दिली. तर आज या G20 परिषदेचा दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर G20 च्या दुसऱ्या दिवसाचं निर्धारित वेळापत्रक पाहूया, त्या आधी बैठकीच्या पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर देखील एक नजर टाकूया.
पहिल्या दिवशी घेतलेले महत्त्वाचे निर्णय
शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा (AU) समावेश, रशिया-युक्रेन धान्य करार पुन्हा सुरू करणे आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करणे यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि यासह शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सांगता झाली.
शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचं नियोजन काय?
शिष्टमंडळाचे नेते आणि विविध देशांचे अध्यक्ष आज सकाळी 8.15 ते 9 या वेळेत स्वतंत्र ताफ्यातून राजघाटावर पोहोचतील.
सकाळी 9.00 ते 9.20 या वेळेत सर्व नेते महात्मा गांधींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करतील. यावेळी महात्मा गांधींच्या आवडत्या भक्तिगीतांचे लाईव्ह परफॉर्मन्सही सादर केले जाणार आहेत.
सकाळी 9:20 वाजता शिष्टमंडळाचे नेते आणि विविध देशांचे अध्यक्ष भारत मंडपमच्या लीडर्स लाऊंजमध्ये जातील.
सकाळी 9.40 ते 10.15 या वेळेत सर्व परदेशी पाहुणे भारत मंडपम येथे पोहोचतील.
भारत मंडपमच्या दक्षिण प्लाझामध्ये सकाळी 10.15 ते 10:30 या वेळेत वृक्षारोपण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
शिखर परिषदेचं तिसरं सत्र सकाळी 10:30 ते 12:30 दरम्यान होणार आहे. यानंतर नवी दिल्लीतील नेत्यांच्या घोषणा स्वीकारल्या जातील.
बायडेन, सुनक आणि जस्टिन ट्रूडो यांची परिषदेला उपस्थिती
दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
जिनपिंग आणि पुतीन भारतात आले नाहीत
विशेष म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या परिषदेत सहभागी झाले नाहीत. मात्र, या शिखर परिषदेत चीनचं प्रतिनिधित्व चीनचे पंतप्रधान ली कियांग करत आहेत आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे रशियाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
हेही वाचा: