PM Narendra Modi : हवामान आणि पर्यावरणीय आव्हानांचा सर्वांगीण पद्धतीनं सामना करण्यासाठी जी- 20 देश एकत्र येतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला. वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेने जी-20 देश एकत्र काम करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची चौथी आणि अखेरची बैठक चेन्नई पार पडली. त्या बैठकीत पंतप्रधान बोलत होते.
हवामान आणि पर्यावरणाशी संबंधित गंभीर आव्हानांवर या बैठकीत चर्चा
पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मंत्रिस्तरीय बैठकीला अन्य देशांमधील 41 मंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत जमीन आणि जैवविविधता, नील अर्थव्यवस्था, जल संसाधन व्यवस्थापन आणि चक्राकार अर्थव्यवस्था या पर्यावरण आणि हवामान अंतर्गत प्राधान्य असलेल्या क्षेत्रांवर केंद्रित महत्त्वपूर्ण कामगिरी आणि प्रमुख उपाययोजना अधोरेखित करण्यात आल्या. या बैठकीत जी 20 सदस्य देश, निमंत्रित देशांचे प्रतिनिधित्व करणारे 225 हून अधिक प्रतिनिधी तसेच यूएनईपी , यूएनएफसीसी , कॉप 28 आणि यूएनसीसीडी सह 23 आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग होता. जागतिक महत्त्व असलेल्या हवामान आणि पर्यावरणाशी संबंधित गंभीर आव्हानांवर या बैठकीत चर्चा झाली.
हवामान बदल, जैवविविधताविषयक हानी, तसेच प्रदूषण यांसारख्या गुंतागुंतीच्या आणि एकमेकांशी संबंधित असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जी - 20 देशांमध्ये सहयोगी संबंध निर्माण करण्याला पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रोत्साहन दिले. शाश्वत आणि लवचिक भविष्याबाबत एकीकृत दृष्टीकोनाची जोपासना करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक देशासमोर विशिष्ठ आव्हानं आणि क्षमता असताना, त्यांनी हवामानविषयक कृती तसेच पर्यावरणीय शाश्वतता यांच्याप्रती अतुलनीय कटीबद्धता दर्शवल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्येक देशाचे आभार मानले.
विविध देशांच्या नेत्यांनी मानले भारताचे आभार
बैठकीदरम्यान, जल व्यवस्थापन, खाणकामामुळे प्रभावित क्षेत्र आणि वणव्यांमुळे प्रभावित भाग यांच्या संदर्भात सर्वोत्तम पद्धतींच्या संदर्भात संकलन विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत उपस्थित नेत्यांनी भारताच्या अध्यक्षतेचे आभार मानले. ‘शाश्वत आणि लवचिक नील अर्थव्यवस्था’ या संकल्पनेवर आधारित तांत्रिक अभ्यासविषयक प्रयत्न केल्याबद्दल तसेच पोलाद क्षेत्रातील चक्राकार अर्थव्यवस्थेबाबत माहितीची देवाणघेवाण, उत्पादकाची विस्तारित जबाबदारी, चक्राकार जैवअर्थव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तंत्रज्ञान दस्तावेज तयार केल्याबद्दल देखील या नेत्यांनी भारताचे आभार मानले. जी-20 जागतिक भूमी उपक्रमाला बळकटी आणण्यासाठी भारतीय अध्यक्षतेने जी-20 सदस्यांच्या स्वयंसेवी स्वीकारार्थ ‘गांधीनगर मार्गदर्शक आराखडा’ आणि ‘गांधीनगर अंमलबजावणी चौकट’यांचा देखील प्रस्ताव ठेवला. या बैठकीत एका शाश्वत आणि लवचिक नील आधारित अर्थव्यवस्थेसाठी 'चेन्नई उच्च स्तरीय तत्त्वे ' या निष्कर्ष दस्तावेजाचा एकमताने स्वीकार करण्यात आला. हा दस्तावेज जी 20 नवी दिल्ली नेत्यांचा जाहीरनामा नेत्यांना अभ्यासासाठी सादर केला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या: