Manipur Violence: मणिपूरमधील (Manipur) हिंसाचाराला आता जवळपास तीन महिने पूर्ण होत आहेत. विरोधी पक्षाकडून (Opposition Party) सातत्याने या मुद्द्यावर केंद्र सरकारवर (Government) निशाणा साधण्यात येत आहे. तसेच मणिपूरबाबत विरोधी पक्षाकडून सरकारला जाब देखील विचारण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया)'च्या खासदारांचे शिष्टमंडळ शनिवार (29 जुलै) रोजी मणिपूरमध्ये दाखल होणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार गौरव गोगोई हे करणार आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान मणिपूरला विसरले असतील पण आम्ही विसरलो नाही. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन तिथल्या लोकांची भेट घेणार आहोत.'
पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'हिंसाचारग्रस्त ठिकाणी जाणे आपल्यासाठी कठीण आहे. परंतु तरीही राज्यात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे लोकांच्या आयुष्यावर बराच परिणाम झाला आहे. त्यामुळे मदत शिबिरांमध्ये जाऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. तसेच इथल्या लोकांसाठी सरकार काय करणार हे देखील आम्ही पाहणार आहोत.' तर सरकारने आतापर्यंत या लोकांसाठी काय केलं असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मणिपूरचा मु्द्दा संसदेत परखडपणे मांडता यावा यासाठी आम्ही मणिपूरचा दौरा करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
शिष्टमंडळात कोण सहभागी ?
विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या इंडियामध्ये जे पक्ष सामील झाले आहेत त्या पक्षातील खासदार मणिपूरमध्ये जाणार आहेत. यामध्ये एकूण 21 खासदारांचा समावेश आहे. ज्यामध्ये काँग्रेसचे 4 खासदार, जेडीयूचे 2 खासदार, टीएमसी, डीएमके, आरएलडी, शिवसेना (ठाकरे गट) आणि आपचा प्रत्येकी एक खासदार या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहे. याशिवाय इतर विरोधी पक्षांमधील एकूण 10 खासदार देखील या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.
या शिष्टमंडळात काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई आणि फुलोदेवी नेताम, जनता दल (युनायटेड)चे राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग आणि अनिल हेगडे, तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव, झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माळी, द्रमुकच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कनिमोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहम्मद फैजल यांचा समावेश आहे. तसेच या शिष्टमंडळात, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज कुमार झा, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन आणि व्हीसीके पक्षाचे टी थिरुमावलावन हे देखील सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. तर केंद्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार दोन्ही या मुद्द्यावर भाष्य करण्यास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'इंडिया' हे नाव गुलामगिरीचं प्रतीक, ते घटनेतून वगळलं पाहिजे; भाजप खासदाराची राज्यसभेत मागणी