Free Laptop : विद्यार्थ्यांना केंद्र सरकार  (Central Government) मोफत लॅपटॉप देणार असल्याचे मेसेज अनेक विद्यार्थ्यांना आले आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेबाबत तुम्हालाही मेसेज आला असेल तर सावधान, कारण हा मेसेज खरा नाही. 


केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे मेसेज अनेकांना पाठवले जात आहेत. केंद्र सरकारकडून मोफत लॅपटॉप देण्यात येणार असून त्यासाठी प्रथम या मेसेजवरून नोदणी करण्यास सांगण्यात येत आहे. या मेसेजसोबत एका वेबसाईटची लिंक देखील देण्यात आली आहे. या लिंकमधील संपूर्ण माहिती भरण्यास सांगण्यात येत आहे. परंतु, या मेसेज मागील सत्यता पडताळण्यात आल्यानंतर हा मेसेज खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणाऱ्या या मेसेजमधून फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हालाही मोफत लॅपटॉप योजनेचा मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. 


सरकारकडून मोफत लॅपटॉप दिले जाणार नाहीत
मोफत लॅपटॉप देण्याची कोणतीही केंद्र सरकारची योजना नाही. अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना याबाबत जागरूक करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या मेसेजमध्ये देण्यात आलेली लिंक ओपन करून त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरली तर तुमची फसवणूक होऊ शकते. 


अशा घटनांमागील तथ्य तपासणी करणारी सरकारी संस्था PIBFactCheck ने या मेसेजची पडताळणी केल्यानंतर मेसेजमधील मोफत लॅपटॉप देण्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा मेसेज फेक असल्याचे म्हटले आहे.  






गेल्या काही वर्षांत सरकारी योजनांच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. फसवणूक करणाऱ्यांसाठी हा एक सोपा मार्ग आहे, कारण लोकांचा सरकारी योजनांवर विश्वास असतो.  त्यामुळे सायबर गुन्हेगार अशा गोष्टींचा फायदा घेतात. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या मेसेजपासून सावध राहा असे पीआयबीने म्हटले आहे.