Vedanta-Foxconn : तब्बल 1 लाख 20 कोटी रुपयांचा प्रकल्प भारतात उभारणाऱ्या फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीची कालपासून चर्चा सुरु आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार अशी चर्चा होती, पण ऐनवेळी तो गुजरातला गेला. बरंच काही चांगलं कंपनीच्या भारतात येण्याने होणार आहेच. पण कंपनीचा जो इतिहास आहे, त्यात वचनभंगांची मालिकाही दडली आहे.


फॉक्सकॉन..इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे घटक बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी. महाराष्ट्रात ही कंपनी येता येता राहिली. भारतीय कंपनी वेदांताच्या सहकार्याने या कंपनीचा तब्बल 1 लाख 20 कोटी रुपयांचा प्रकल्प आता गुजरातमध्ये उभा राहणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री, देशाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांच्या उपस्थितीत काल (13 सप्टेंबर) वेदांता कंपनीच्या चेअरमननी ही घोषणा केली.


भारतीय कंपनी वेदांताचा 60 टक्के वाटा तर आंतरराष्ट्रीय कंपनी फॉक्सकॉनचा 40 टक्के वाटा अशी ही भागीदारी असणार आहे. महाराष्ट्राच्या हातून हा प्रोजेक्ट निसटला आहे यावर कालच्या घडामोडींनी शिक्कामोर्तब झालं. पण फॉक्सकॉनकडून असा वचनभंग केवळ महाराष्ट्राचा झालेला नाही, तर जगात अनेक देशांचाही झाल्याचा कंपनीचा इतिहास सांगतो. गेल्या दहा वर्षातली यादी पाहिली तर तुम्ही थक्क व्हाल. 


फॉक्सकॉनचा जागतिक स्तरावरचा वचनभंगाचा इतिहास 



  • 2011 - फॉक्सकॉनने ब्राझीलमध्ये सेल फोन, टॅबलेट, टीव्ही स्क्रीनच्या उत्पादनासाठी 12 बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याचं जाहीर केलं. पण त्यानंतर ही गुंतवणूक झाली नाही

  • 2013 - अमेरिकेच्या पेनिसिल्विनियात 30 मिलियन डॉलरचं आश्वासन देत अत्याधुनिक कारखाना निर्मितीची घोषणा केली, पण ती हवेतच विरली

  • 2014 - फॉक्सकॉनने इंडोनेशियात 1 बिलियन डॉलर गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला. पण तो मार्गी लागलेला नाही.

  • 2015 - भारतातच अॅपल हॅण्डसेटच्या उत्पादनासाठी फॉक्सकॉन कंपनीच्या लोकांनी महाराष्ट्र सरकारला आश्वासन दिलं, पण ते प्रत्यक्षात उतरलं नाही. इतकंच काय अमेरिकसारख्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष आणि स्वत: उद्योगपती असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातही या कंपनीने अमेरिकेतल्या विसकॉन्सिनमध्ये प्राथमिक करार केला, पण तो प्रत्यक्षात मार्गी लागला नाही. 


अमेरिकेत तर फॉक्सकॉनच्या एपिसोडवर एक पुस्तकही छापून आलं आहे. 'फॉक्सकॉनड्...आभासी रोजगार, उद्धवस्त घरं आणि स्थानिक सरकारांमधला सत्ताबदल', असं या पुस्तकाचं शीर्षक आहे.


फॉक्सकॉनला भारतात प्रवेशाची संधी
पण अर्थात भारतासारख्या मोठी लोकसंख्या, मोठं मार्केट असलेल्या देशात प्रवेशाची संधी या कंपनीला आता मिळाली आहे. ही त्यांच्याही वाढीसाठी मोठीच संधी आहे. शिवाय काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलवरुन कराराबद्दल अभिनंदन वगैरेही केलं आहे. फॉक्सकॉनचा एक दुसरा प्रकल्प सध्या चेन्नईत सुरुही आहे.


सेमीकंडक्टरच्या उत्पादनात भारत प्रथमच आत्मनिर्भर होणार
फॉक्सकॉनमुळे भारत सेमीकंडक्टरच्या उत्पादनात प्रथमच आत्मनिर्भर होणार आहे. मध्यंतरी याच सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे गाडी खरेदी करण्यासाठी लांबच लांब वेटिंग सुरु होतं. मोबाईल क्षेत्रातही याचा दूरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे फॉक्सकॉन किमान भारताचा वचनभंग करणार नाही अशी आशा बाळगुयात. गुजरातमध्ये दोन वर्षात उत्पादन सुरु होईल असं आता सांगितलं जातंय, तो दिवस लवकर येणं हेच देशाच्या हिताचं असेल.