Fourteen Cheetahs will come to India from Africa: लवकरच आफ्रिकेतून (Africa) आणखी 12 ते 14 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत ही महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, येत्या पाच वर्षांत आफ्रिकेतून 12 ते 14 चित्ते भारतात आणले जातील. यासाठी भारत सरकारनं नामिबिया सरकारसोबत करारही केला आहे.


नुकतेच नामिबियातील (Namibia News) आठ चित्ते भारतात आणून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) सोडण्यात आलं. त्यात 5 मादी आणि 3 नरांचा समावेश होता. कुनो येथे स्थायिक झाल्यानंतर चित्त्यांनीही तेथे शिकार करण्यास सुरुवात केली आहे. आधी आणलेले सर्व चित्ते (Project Cheetah) भारतातील हवामानाशी जुळवून घेत आहेत, असंही ते म्हणाले. 


संसदेत माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, प्रोजेक्ट टायगर अंतर्गत, चित्ते भारतात परतण्यासाठी 38.7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा प्रकल्प 2021/22 पासून सुरू झाला होता, तो 2025/26 पर्यंत चालेल.


अधिक माहिती देताना अश्विनीकुमार चौबे म्हणाले की, कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेले 8 चित्ते पूर्णपणे ठीक आहेत. त्यांच्यावर चोवीस तास देखरेखीखालील ठेवण्यात येत आहे. 


नामिबियातून आणलेल्या सर्व चित्त्यांना काही काळ क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात आलं. सर्वात शेवटी सोडण्यात आलेल्या 3 मादी चित्ते होते, त्यांना गेल्या महिन्यातच जंगलात सोडण्यात आलं. 


कुनो नॅशनल पार्कचे क्षेत्र संचालक उत्तम शर्मा यांनी सांगितलं की, आता सर्व चित्ते सामंजस्य प्रस्थापित करतील आणि जंगलाचा शोध घेतील. त्यानंतर स्वतःचं पोट भरण्यासाठी शिकारही करतील. त्यांची चोवीस तास देखरेख केली जात आहे. 


उत्तम शर्मा यांनी सांगितलं की, नर चित्त्यांना शिकारीची सवय झाली आहे. तसेच, लवकरच मादा चित्ते देखील यात प्रभुत्व मिळवतील. चार हाय-रिझोल्युशन कॅमेऱ्यांद्वारे चित्तांवर नजर ठेवली जाईल. 16 वनरक्षकांचं पथक त्यांची देखरेख करणार आहे. प्रत्येक चित्त्यावर नजर ठेवण्यासाठी 2 वनरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी स्निफर डॉगही बसवण्यात येणार आहे.


तज्ज्ञांच्या मते, खरं मोठं आव्हान त्यांना जंगलात सोडल्यानंतर असेल. त्यांना नव्या अधिवासात राहणं, शिकणं आणि शिकार करणं शिकावं लागेल. यादरम्यान त्यांना परिसरात फिरणाऱ्या 45 बिबट्या आणि वाघाचा सामना करावा लागतो.


चित्त्यांसमोरील आव्हानं


भारतात आणलेल्या चित्त्यांसमोर काही आव्हानं असतील. चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल. चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना 12 किलोमीटरच्या विशेष अधिवासात विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येईल.