Who Is Dr. Bindeshwar Pathak : भारतीयांना शौचालयांचे महत्त्व पटवून देणारे, सावर्जनिक शौचालयांची साखळी निर्माण करणारे डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे (Bindeshwar Pathak) आज निधन झाले. डॉ. पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना करून सामान्यांसाठी सार्वजनिक शौचालये उभारली. आज देशातील प्रत्येक शहरात सुलभ इंटरनॅशनल दिसून येतात, त्याचे श्रेय डॉ. पाठक यांना दिले जाते.
बिहारमधील वैशाली जिल्ह्यात 2 एप्रिल 1943 रोजी बिंदेश्वर पाठक यांचा जन्म झाला. सुलभ शौचालयांना डॉ. पाठक यांनी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड केला.
घरात 9 खोल्या पण एकही शौचालय नाही
बिंदेश्वर पाठक यांचे घर आकाराने मोठे होते. घरात 9 खोल्या होत्या. मात्र, एकही शौचालय नव्हते. घरातील महिलांना नैसर्गिक विधींसाठी पहाटेच्या सुमारास उठावे लागत असे. दिवसा त्यांना उघड्यावर शौच करणे, अशक्य होते. उघड्यावरील शौचालयांमुळे त्यांना आजारांचा संसर्ग होते असे. हे दृष्य पाहून डॉ. पाठक यांनी यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, हे ठरवले होते.
पाठक यांचे शिक्षण बिहार आणि उत्तर प्रदेशमधून झाले. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात पदवी मिळवली. यानंतर पुढील काळात त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी केली. त्यांनी 1968-69 मध्ये बिहार गांधी जन्मशताब्दी उत्सव समितीसोबत काम केले. या दरम्यानच समितीने त्यांना परवडणारे टॉयलेट तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करण्यास सांगितले. त्या काळात उच्चवर्णीय पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मुलासाठी शौचालय क्षेत्रात काम करणे सोपे नव्हते. पण डॉ. पाठक हे आपल्या निश्चयापासून कधीच मागे हटला नाही. हाताने मैला साफ करण्याची समस्याआणि उघड्यावर शौचास जाण्याच्या समस्येवर त्यांनी काम केले.
वडील नाराज...सासऱ्यांनीही व्यक्त केला संताप
देशाला उघड्यावरील शौचमुक्त करण्यासाठी पाठक सतत कार्यरत होते. त्यांच्या या कामावर त्यांचे वडील चांगलेच चिडले होते. इतर नातेवाईकांनाही राग आला होता. शौचालयाच्या कामामुळे पाठकचे सासरे चांगलेच संतापले. त्यांनी, जावयावरील संताप व्यक्त करताना पाठकांना कधीही तोंड दाखवू नका असे सांगितले होते. आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे ते म्हणायचे. या सर्व गोष्टींना उत्तर देताना पाठक एकच म्हणायचे की ते गांधीजींचे स्वप्न पूर्ण करत आहेत.
जातीव्यवस्थेमुळे समाजातील मोठ्या समूहाला प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकारही नव्हता.
बिंदेश्वर पाठक हे सहा वर्षांचे असताना त्यांनी मेहतर समाजातील एका महिलेला स्पर्श केल्याने त्यांच्या आजीने त्यांना शिक्षा दिली असल्याचे पाठक यांनी स्वत: सांगितले होते. जातीच्या उतरंडीमध्ये उच्च स्थानी असलेल्या समाजातील पाठक यांनी शौचालयाचे काम करणे, हे त्यांच्या नातेवाईकांना का पटत नव्हते, याचे उत्तर या घटनेत आहे.
बिंदेश्वर पाठक यांनी स्वच्छेतेसाठी काम करणाऱ्या महिलांसाठी खूप काम केले. सुलभ इंटरनॅशनलची स्थापना करून त्यांनी ट्विन-पिट फ्लश टॉयलेट विकसित केले. 'सुलभ'च्या माध्यमातून समाजात महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात महिलांचा सहभाग अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.
डिस्पोजल कंपोस्ट शौचालय
1970 मध्ये बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली. ही एक सामाजिक संस्था होती. सुलभ इंटरनॅशनलच्या माध्यमातून पाठक यांनी दोन खड्ड्यांचा फ्लश टॉयलेट तयार केले. त्यांनी डिस्पोजल कंपोस्ट शौचालय तयार केले. हे शौचालय अतिशय कमी दरात घराच्या आजूबाजूच्या परिसरात मिळणाऱ्या साहित्यातून तयार करण्यात येत असे. त्यानंतर डॉ. पाठक यांनी देशभरात शौचालय उभारणीचे काम सुरू केले.
देशभरात सुलभचे 8500 शौचालये
सुलभ इंटरनॅशनलची देशभरात सुमारे 8500 शौचालये आणि स्नानगृहे आहेत. सुलभ इंटरनॅशनलचे टॉयलेट वापरण्यासाठी 5 रुपये आणि आंघोळीसाठी 10 रुपये आकारले जातात. तर अनेक ठिकाणी ते सामुदायिक वापरासाठीही मोफत ठेवण्यात आले आहेत.
स्वच्छता, पर्यावरण आदी क्षेत्रात केलेल्या कामांसाठी डॉ. पाठक यांना भारत सरकारने पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्याशिवाय, देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले.