चंदीगड : सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चं नेतृत्त्व करणारे लेफ्टनंट जनरल पीएन हून यांचं निधन झालं. चंदीगडमध्ये सोमवारी (6 जानेवारी) संध्याकाळी वयाच्या 91 व्या वर्षी पीएन हून अर्थात प्रेम नाथ हून यांनी अखेरचा श्वास घेतला. लेफ्टिनेंट जनरल पीएन हून यांच्यावर दोन दिवसांपासून पंचकुलाच्या कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी 6 जानेवारी संध्याकाळी 5.30 वाजता त्यांना मृत घोषित केलं. 1984 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात पीएन हून यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

पीएन हून यांच्या नेतृत्त्वात भारतीय सैन्याने जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये तिरंगा फडकावला होता. पीएन हून यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1929 रोजी पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये झाला होता. परंतु फाळणीच्या वेळी त्यांचं कुटुंब भारतात आलं. 1987 मध्ये पश्चिम कमांडे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते. यानंतर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

काय आहे ऑपरेशन मेघदूत?

भारताची गुप्तचर यंत्रणा रॉकडून माहिती मिळाली होती की, 17 एप्रिल 1984 रोजी पाकिस्तानी सैन्य सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी चढाई करणार आहे. जर पाकिस्तानने सियाचीनवर ताबा मिळवला तर पाकला पराभूत करण्यासाठी भारतीय सैन्याला जास्त मेहनत घ्यावी लागेल. ही माहिती मिळताच भारतीय सैन्य अलर्ट झालं.

यानंतर 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याने सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' लॉन्च केलं. विशेष बाब म्हणजे बर्फात घातले जाणारे कपडे आणि काही मोजक्या उपकरणांसह ते 12 एप्रिलच्या रात्रीच भारतीय सैन्याजवळ पोहोचले होते. जगातील सर्वात उंच युद्धभूमीतील संघर्षाची ही पहिलीच घटना होती. याला 'ऑपरेशन मेघदूत' नाव देण्यात आलं होतं. या ऑपरेशनने भारताच्या सामरिक विजयाचा पाया रचला होता.

सियाचीन भौगोलिक स्थिती अशी आहे की, भारताच्या दिशेला सियाचीनचा उभा चढ आहे, यामुळे ऑपरेशन मेघदूत अतिशय कठीण होतं. तर पाकिस्तानच्या बाजूची उंची फार कमी आहे. अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला. त्यामुळे जगभरातील यशस्वी लढायांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चाही समावेश होतो. हे एक वेगळंच युद्ध होतं, ज्यात भारतीय सैन्याने उणे  60 पासून उणे 70 अंश सेल्सिअस तापमानात सर्वात उंच युद्धभूमीवर जाऊन विजय मिळवला होता. तर पाकिस्तानसाठी हा लाजिरवाणा पराभव होता.