Former Union Minister Pandit Sukh Ram Passes Away : माजी केंद्रीय केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक होती. अशा परिस्थितीत त्यांना दिल्लीतील एम्समधील व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. गेल्या शनिवारी प्रकृती खालावल्यानं त्यांना हेलिकॉप्टरनं दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
काँग्रेस नेते आणि सुखराम शर्मा यांचे नातू आश्रय शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आजोबांच्या निधनाची माहिती दिली होती. 'गुडबाय आजोबा, फोन अजून वाजणार नाही.', असं मंगळवारी रात्री त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिलं. आश्रय शर्मा यांनी आजोबांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी सुखकुमार यांचं निधन कधी झालं याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.
कुटुंबीयांकडून दिलेल्या माहितीनुसार, आज पंडित सुखराम यांचं पार्थिव दिल्लीहून हिमाचल प्रदेश येथील मंडीमध्ये आणलं जाणार आहे. सलापड, सुंदरनगर, नाचन आणि बाल्हसह मंडी सदरमध्ये पंडित सुखराम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहतील. उद्या सकाळी 11 वाजता पंडित सुखराम यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मंडी शहरातील ऐतिहासिक सेरी व्यासपीठावर ठेवण्यात येणार असून, त्यानंतर हनुमानघाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पाच वर्षांची शिक्षा
पंडित सुखराम शर्मा 1993-1996 दरम्यान केंद्रीय दळणवळण मंत्री होते. ते मंडी (हिमाचल प्रदेश) येथून लोकसभेचे खासदार होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत सुखराम यांनी पाच वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. आता सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा हे मंडीतून भाजपचे आमदार आहेत. 2011 मध्ये सुखराम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना 2011 मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 1996 मध्ये दळणवळण मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.