Manmohan Singh Discharged: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती आता स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तापाची लक्षणं आणि प्रकृत्ती अस्वस्थ वाटत असल्याने डॉ. मनमोहन सिंह यांना काही दिवसांपूर्वी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. 


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्या दरम्यान काढलेला एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. डॉ. मनमोहन सिंह यांची मुलगी दमन सिंह यांनी मांडवीया यांच्यावर टीका केली होती.


काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती खालावल्याची तसेच त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. 


मनमोहन सिंह यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आलं. माजी पंतप्रधानांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.


माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह 89 वर्षांचे आहेत आणि ते शुगरच्या आजारानेही त्रस्त आहेत.  डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 साली ब्रिटनमध्ये करण्यात आली. तर दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये 2009 साली करण्यात आली आहे. गेल्या वर्षी औषधाची रिअॅक्शन आणि ताप आल्यानंतर मनमोहन सिंह यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.


महत्वाच्या बातम्या :