नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडल्याने तीन दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, आज दुपारपासून सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याची अफवा पसरवली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना डेंग्यू असल्याचे आढळून आले आहे. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. 


रुग्णालयातील एका रुग्णाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंह असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोसोबत मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याचंही म्हटले आहे. मात्र, या सर्व गोष्टी असत्य आहेत.


"मनमोहन सिंह यांच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे," असे एम्सच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. मनमोहन सिंह यांना रुग्णालयाच्या कार्डिओ-न्यूरो सेंटरच्या एका खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हृदयरोगतज्ज्ञांचं पथक त्यांची काळजी घेत आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बैठकीदरम्यान एक छायाचित्रकारही त्याच्यासोबत उपस्थित होता, ज्यामुळे वाद निर्माण झाला. मनमोहन सिंह यांची मुलगी दमन सिंह यांनी मांडवीया यांना कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात छायाचित्रकार सोबत घेऊन आल्याने लक्ष्य केलं.


दमन सिंह यांनी एका न्यूज वेबसाईटला सांगितले की, त्यांची आई खूप अस्वस्थ होती. कारण, एका छायाचित्रकाराने मंत्र्यासह खोलीत प्रवेश केला होता. परंतु, जेव्हा तिने फोटोग्राफरला खोलीतून बाहेर काढण्याचा आग्रह केला तेव्हा "तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. दमन सिंह म्हणाले, 'ती खूप अस्वस्थ होती. माझे पालक कठीण परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वृद्ध लोक आहेत. प्राणीसंग्रहालयात ठेवलेले प्राणी नाहीत.'


मनमोहन सिंह 88 वर्षांचे आहेत आणि ते साखरेच्या आजारानेही त्रस्त आहेत. माजी पंतप्रधान सिंह यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर 2009 मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी, एका नवीन औषधामुळे रिअॅक्शन आणि ताप आल्यानंतरही मनमोहन सिंह यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.