नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज (24 ऑगस्ट) निधन झालं. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे जेटली यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपासून त्यांना लाईफ केअर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. अखेर वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

किडनी ट्रान्सप्लांटनंतर अरुण जेटली यांचा आजार बळावला होता. 2019 च्या निवडणुकीत तर ते बाहेरही पडू शकले नाहीत. निवडणूक जिंकल्यानंतर पत्र लिहून जेटलींनी आपला मंत्रिमंडळात समावेश करु नये अशी विनंती केली. मोदींनीही ती मान्य केली. "गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये," असं स्वत: जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.

अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द

28 डिसेंबर 1952 रोजी दिल्लीमध्ये जन्मलेल्या अरुण जेटली यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी प्रॅक्टिस केली आणि लवकरच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ तसंच नामवंत वकिलांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला.

श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून (एसआरसीसी) पदवीचं शिक्षण घेताना अरुण जेटली 1974 मध्ये विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षही होते. या काळात काँग्रेस फारच मजबूत होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार म्हणून अरुण जेटलींचा विजय हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात म्हटली जाते.

1973-74 या काळात जयप्रकाश नारायण यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठं आंदोलन छेडलं. जेपी यांना आपले राजकीय गुरु मानणाऱ्या अरुण जेटली यांनी या आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला.

1975 मध्ये आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांनीही कारावास भोगला होता. 22 महिन्यांच्या आणीबाणीच्या काळात जेटलींना 19 महिने दिल्लीच्या तिहार जेलमध्ये होते.

1977 मध्ये निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. जनता पार्टीला सत्तेत येण्याची संधी मिळाली आणि अरुण जेटली हे  लोकशाही युवा मोर्चाचे संयोजक बनले.

याच वर्षी त्यांची अभाविपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. यानंतर त्यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

यानंतर 1980 मध्ये अरुण जेटली भाजपमध्ये सामील झाले. 1991 नंतर ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले.

अरुण जेटली 1999 मध्येअटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यानंतर केंद्रीय कायदामंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रात संरक्षण आणि अर्थ खात्याची जबाबदारी होती.

मोदींना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर आणण्यात मोठी भूमिका

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तयार नव्हते. त्यावेळी जेटलींनी अडवाणींची नाराजी पत्करुन मोदींना पक्षाचा चेहरा म्हणून पुढे आणलं. मोदी बडोदा आणि वाराणसी मतदारसंघातून लढले. जेटलींसाठी त्यांनी अत्यंत सेफ अशी अमृतसरची जागा निवडली. तरीही जेटली पराभूत झाले होते. मात्र त्यानंतरही मोदींनी त्यांना केंद्रात संरक्षण आणि अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली होती.

राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया

अरुण जेटली यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झालं. आजाराला त्यांनी नेटाने लढा दिला. निष्णात वकील, उत्तम संसदपटू आणि प्रतिष्ठित मंत्री, त्यांनी देशाच्या उभारणीसाठी मोठं योगदान दिलं, असं ट्वीट कोविंद यांनी केलं आहे.

"भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झालं. आपण एक उत्कृष्ट संसदपटू गमावला. मी त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Deeply saddened by the demise of veteren BJP leader Shri Arun Jaitley. We have lost an astute parliamentarian, avid reader and a compassionate leader. I extend my heartfelt condolence to his family members. May his soul rest in peace.


— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 24, 2019

VIDEO | अरुण जेटलींची सरकारमधून निवृत्तीची घोषणा | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा