नवी दिल्ली : काँग्रेसमधून निलंबित वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरातील पाक लष्करप्रमुखांच्या बैठकीवरुन खुलासा करण्यात आहे. विशेष म्हणजे, हा खुलासा भारताचे माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाक लष्करप्रमुखांसोबत केवळ भारत-पाक संबंधांवर चर्चा झाल्यासं, कपूर यांनी स्पष्ट केलं.


पंतप्रधान मोदींचे आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गुजरातमधल्या बनासकांठमधील एका प्रचारसभेत बोलताना मणिशंकर अय्यर यांच्या घरात एक बैठक झाल्याचा आरोप केला होता. तसेच या बैठकीत पाकिस्तानचे उच्चायुक्त आणि माजी परराष्ट्र मंत्री सहभागी झाले असल्याचं यावेळी सांगितलं होतं.

माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांचं स्पष्टीकरण

पण पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसवरील आरोपांवर माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत दीपक कपूर म्हणाले की, “मी स्वत: त्या बैठकीला उपस्थित होतो. बैठकीत केवळ भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांवरच चर्चा झाली. इतर कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा झाली नाही.”

'पाककडून अहमद पटेलांना गुजरातचा मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन'

पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रचारसभेतून दावा केला होता की, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माजी उपराष्ट्रपती हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.” शिवाय, पाकिस्तानच्या एका लष्करातील अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं की, “पाकिस्तानने अहमद पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं आहे.”

पंतप्रधानांच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर

दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर काँग्रेसने पलटवार केला. “गुजरात निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्याने, पंतप्रधान मोदी अशी वक्तव्यं करत आहेत,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, “देशाच्या सर्वोच्च पदावर असूनही, पंतप्रधान मोदी कोणताही आधार नसलेले आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपात काहीही तथ्य नाही. अशा प्रकारचे आरोप करणं हे पंतप्रधानांना शोभा देत नाही.”

'पठाणकोट एअरबेसवर 'त्यांना' का येऊ दिलं?'

सुरजेवाल पुढे म्हणाले की, “संपूर्ण देशातील जनतेला माहिती आहे की, पाकिस्तानवर कुणाचं सर्वाधिक प्रेम आहे. कोण फुटीरतावाद्यांना संरक्षण देत आहे? जर मोदीजींना पाकिस्तानशी संबंधित मुद्द्यांवरच निवडणूक लढवायची आहे, तर त्यांनी गुजरातमधील जनतेला आधी सांगावं की, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयवर विश्वास करुन, पठाणकोट एअरबेसवर येण्याची परवानगी का दिली होती?” त्याशिवाय, सुरजेवाला यांनी प्रोटोकॉल तोडून केलेल्या पाकिस्तान यात्रेवरुनही पंतप्रधान मोदींना घेरलं.

मोदींच्या आरोपांवर अहमद पटेलांचा पलटवार

दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनीही  पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान पदावर विराजमान असलेली व्यक्ती अशा खोट्या अफवाहांवर विश्वास ठेवतो. आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी खोटं बोलत आहे.”

संबंधित बातम्या

काँग्रेस नेत्यांची पाकिस्तानच्या माजी मंत्र्यासोबत बैठक, मोदींचा आरोप